अभिनेत्री किशोरी गोडबोले छोट्या पडद्यावर करणार पुनरागमन

68

सामना ऑनलाईन । मुंबई

मराठी टेलिव्हिजन आणि चित्रपट क्षेत्रातील अतिशय प्रसिद्ध चेहरा, किशोरी गोडबोले गेल्या 3 वर्षांपेक्षा जास्त काळ छोट्या पडद्यापासून दूर आहे. पण आता ती ‘मेरे साई’ मालिकेत बायजा माँच्या भूमिकेत दिसणार आहे. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मेरे साई – श्रद्धा और सबुरी’ ही मालिका अनेक प्रेक्षक नित्यनेमाने बघत असल्यामुळे त्याची प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढत आहे. प्रेक्षकांना त्यातील साधेपणा भावतो आणि साई बाबांची शिकवण प्रत्यक्ष पडद्यावर बघणे ही प्रेक्षकांसाठी एक दृश्य मेजवानीच आहे. केवळ प्रेक्षकांच्या अतीव प्रेमामुळेच या मालिकेने नुकताच 400 एपिसोड्सचा टप्पा गाठला आहे.

किशोरीशी संपर्क साधला तेव्हा ती म्हणाली, “मी आणि माझे आई बाबा साई बाबांचे निस्सीम भक्त आहोत आणि जेव्हा बायजा माँची भूमिका करण्यासाठी मला विचारणा झाली तेव्हा तो साई बाबांचा आशीर्वादच आहे असे मला वाटले. जेव्हा ‘मेरे साई’ च्या टीमने मला ऑडिशनसाठी बोलावले, तेव्हा मी अतिशय उत्साहित झाले होते. बायजा माँ एक अतिशय कणखर स्त्री होती आणि त्या काळात हक्कांसाठी ती खंबीरपणे उभी राहत असे, साई बाबांवर तिची अढळ श्रद्धा होती आणि आमच्यामध्ये हाच भक्तीचा समान धागा होता. शिवाय, मालिकेचा दिग्दर्शक सचिन आम्ब्रे याच्याबरोबर या आधी सुद्धा काम केलेले असल्यामुळे पुन्हा त्याच्याबरोबर काम करताना एक वेगळीच सहजता आणि आत्मविश्वास जाणवतो. मालिकेतील या भूमिकेत काही चांगली कामगिरी करण्यासाठी मी उत्सुक आहे. बाबांच्या आशीर्वादाने बायजा माँ च्या भूमिकेत प्रेक्षक मला स्वीकारतील, असा मला विश्वास वाटतो.” असं मनोगत किशोरी हिने व्यक्त केलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या