मुंबईच्या महापौरपदी किशोरी पेडणेकर, उपमहापौरपदी सुहास वाडकर यांची बिनविरोध निवड

2275
मुंबई- किशोरी पेडणेकर (शिवसेना)

गेल्या 25 वर्षांपासून निर्विवाद वर्चस्व असलेल्या मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा एकदा भगवा फडकला असून महापौरपदी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर तर उपमहापौरपदी ऍड. सुहास वाडकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. या दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे आधीच स्पष्ट झाले असून शुक्रवारी पालिका महासभेत यावर शिक्कामोर्तब झाले.

राज्यातील 27 महानगरपालिकांच्या महापौरपदाची पहिल्या अडीच वर्षांची मुदत 21 नोव्हेंबरला संपल्यामुळे मंत्रालयातून गेल्याच आठवड्यात महापौरपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. यानुसार मुंबई महानगरपालिकेसाठी सलग दुसऱ्या वेळी खुल्या प्रवर्गाचे आरक्षण पडले आहे. या पार्श्वभूमीवर अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी 18 नोव्हेंबर रोजी शिवसेनेकडून महापौरपदासाठी किशोरी पेडणेकर आणि उपमहापौरपदासाठी ऍड. सुहास वाडकर यांनी अर्ज सादर केला आहे. पालिकेत शिवसेना 94 नगरसेककांसह सर्वात मोठा पक्ष असल्याने महापौर शिवसेनेचाच होणार हे आधीच स्पष्ट झाले होते. यातच पुरेसे संख्याबळ नसल्याचे सांगत विरोधक आणि भाजपनेही महापौरपदासाठी अर्ज सादर केला नसल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.

तब्बल 50 वर्षांनी बिनविरोध निवडणूक

मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी यावेळी होणारी निवडणूक तब्बल 50 वर्षांनी बिनविरोध होत असल्याची माहिती पालिकेच्या चिटणीस खात्याकडून देण्यात आली. 1888 मध्ये स्थापन झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपद निवडणुकीच्या सध्या उपलब्ध डाटानुसार गेल्या 50 वर्षांत बिनविरोध निवडणूक झाली नसल्याचे चिटणीस खात्याकडून सांगण्यात आले.

 सध्याचे संख्याबळ

एकूण नगरसेवक – 227

शिवसेना – 94

भाजप – 83

काँग्रेस- 29

राष्ट्रवादी – 8

‘सपा’ – 6

‘मनसे’ – 1

‘एमआयएम’ – 2

– चार नगरसेवकांची प्रकरणे न्यायालयात

  मुंबईच्या महापौर व उपमहापौरपदाची घोषणा शुक्रवारी होत असून महापौरपदी किशोरी पेडणेकर आणि उपमहापौरपदी सुहास वाडकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. या दोघांचेही अभिनंदन करण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दुपारी 12 वाजता महापालिकेत उपस्थित राहणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या