बदला घेण्यासाठी कोरोनाग्रस्ताने चुंबन घेतले, हादरलेला वरिष्ठ अधिकारी कायदेशीर कारवाई करणार

फोटो सौजन्य-विकीपीडिया

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने त्याच्यासोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचं ठरवलं आहे. या कर्मचाऱ्याने अधिकाऱ्याचे चुंबन घेतले होते. धक्कादायक बाब ही आहे की ज्या कर्मचाऱ्याने अधिकाऱ्याचे चुंबन घेतले आहे तो कोरोनाग्रस्त आहे. चुंबन घेतल्यानंतर या कर्मचाऱ्याने अधिकाऱ्याला आपण कोरोनाबाधित असल्याचं सांगितलं. यामुळे हादरलेल्या अधिकाऱ्याने या कर्मचाऱ्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचं ठरवलं आहे.

हा अधिकारी कराची महानगरपालिकेमध्ये कामाला आहे. ज्या कर्मचाऱ्याने अधिकाऱ्याचे चुंबन घेतले तो देखील इथेच कामाला होता. 5 ऑक्टोबर रोजी या कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले होते. या कर्मचाऱ्याच्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाल्याने त्याच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली होती.

निलंबित झाल्यापासून या कर्मचाऱ्याला पगार मिळणं बंद झालं होतं, ज्यामुळे तो वैतागला होता. कराची महापालिकेमध्ये काम करणाऱ्या या कर्मचाऱ्याने मनुष्यबळ व्यवस्थापन विभागाच्या संचालकांना मिठी मारली आणि त्यांचे चुंबन घेतले. चुंबन घेतल्यानंतर त्याने या अधिकाऱ्याला आपण कोरोनाग्रस्त असल्याचं सांगितलं. कर्मचाऱ्याने त्याच्याविरोधात कारवाईचा बदला घेण्यासाठी हे कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे.

या कोरोनाग्रस्त कर्मचारी संचालकालाचे चुंबन घेऊन थांबला नाही. हा कर्मचारी महापालिकेतील इतर काही अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांनाही जाऊन भेटला होता. कोरोना झालेला असल्याचे माहिती असूनही त्याने या भेटीगाठी घेतल्या होत्या. जेव्हा हा कर्मचारी कोरोनाग्रस्त असल्याचे कळाले तेव्हा कराची महापालिकेच्या इमारतीत एकच हलकल्लोळ उडाला होता. ज्या-ज्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची या कोरोनाग्रस्त कर्मचाऱ्याने भेट घेतली होती, त्यांनी तत्काळ कार्यालय सोडले.

आपली प्रतिक्रिया द्या