हॉटेलातील स्वयंपाकघराला आकाराचे बंधन नाही

सामना प्रतिनिधी । मुंबई

उपाहारगृह अर्थात हॉटेलांमधील स्वयंपाकघरासाठी १५० चौरस फुटांची अट आता पालिकेने काढून टाकली आहे. पालिकेने याबाबतची नवीन नियमावली जाहीर केली आहे. उपाहारगृह सुरू करण्यासाठी ३०० चौरस फुटांची जागा असणे बंधनकारक असले तरी या नव्या नियमावलीमुळे उपाहारगृहात येणाऱ्या ग्राहकांना बसायला मोठी जागा मिळणार आहे. त्यामुळे गल्लीकोपऱ्यावरच्या सुप्रसिद्ध हॉटेलांमध्ये आता खाण्याची टेबले वाढू शकणार आहेत.

सर्वसामान्य माणसाला परवडणाऱ्या हॉटेलांमध्ये अनेकदा पदार्थ चांगले असतात, पण बसायला जागा नसते. पण यापुढे अशा लहान हॉटेलांमध्ये ग्राहकांसाठी बसण्याची जागा वाढवता येणार आहे. उपाहारगृहांमधील स्वयंपाकघरांसाठी असणारी किमान १५० चौरस फुटांची अट शिथिल करण्याचे पालिका प्रशासनाने ठरवले आहे. ‘इज ऑफ डूइंग बिझनेस’अंतर्गत आरोग्य विभागाने हा निर्णय घेतला असून पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी त्याला प्रशासकीय मान्यता दिली आहे. मात्र उपाहारगृहांसाठी आवश्यक असणारे मुंबई अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र पूर्वीप्रमाणेच बंधनकारक असणार आहे, अशी माहिती आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी दिली आहे. स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या साधनांचा आकार आणि गरजा आता दिवसेंदिवस कमी होऊ लागल्या आहेत. त्यामुळे अनेकदा नव्या इमारतींमध्ये घरांमधील किचनचाही आकार कमी केलेला आढळतो. त्या धर्तीवरच ही अट काढून टाकण्यात आली आहे, मात्र स्वयंपाकघरात कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून अग्निशमन दलाचे प्रमाणपत्र मात्र घ्यावेच लागणार आहे.

आतापर्यंत अट अशी होती
शहर आणि उपनगरात कुठेही उपाहारगृह चालू करावयाचे झाल्यास त्यासाठी किमान ३०० चौरस फूट आकाराची जागा असणे बंधनकारक आहे. या जागेपैकी किमान १५० चौरस फूट एवढी जागा स्वयंपाकघरासाठी वापरली जाणे यापूर्वीच्या अटींनुसार बंधनकारक होते.

नव्या बदलानुसार
उपाहारगृहातील स्वयंपाकघरांसाठी असणारी १५० चौरस फुटांची अट रद्द करण्यात आली आहे. मात्र उपाहारगृहांच्या उंचीबाबत असणारी किमान नऊ फुटांची अट पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात आली आहे.