बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत निवड व्हावी या उद्देशाने टीम इंडियाचे अनेक स्टार खेळाडू दुलीप ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र पहिल्याच दिवशी ऋषभ पंत, सरफराज खान, यशस्वी जैसवाल, वॉशिंग्टन सुंदर, ऋतुराज गायकवाड आणि रजत पाटीदार लौकिकाला साजेसा खेळ करण्यात अपयशी ठरले. त्यामुळे चाहत्यांच्या नजरा केएल राहुलवर खिळल्या होत्या. मात्र तो सुद्धा फ्लॉप ठरला आहे.
शुभमन गिलच्या नेतृत्वात इंडिया ए संघाकडून खेळताना इंडिया बी विरुद्ध केएल राहुलने चाहत्यांचा अपेक्षाभंग केला. सामन्याच्या दुसऱ्या दिवसी राहुल 23 धावा करून नाबाद परतला होता. सामन्याच्या तिसऱ्य दिवशी तो मोठी धावसंख्या करेल अशी क्रिकेटप्रेमींची अपेक्षा होती. मात्र, राहुलने चाहत्यांचा अपेक्षाभंग करत आपल्या धावसंख्येत फक्त 14 धावांची भर घातली आणि 37 या धावसंख्येवर तो बाद झाला. राहुलने 111 चेंडूंमध्ये फक्त 37 धावा केल्या. त्यामुळे आगामी बांगालदेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी राहुलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.
टीम इंडिया आणि बांग्लादेश यांच्यामध्ये घरच्या मैदानावर 19 सप्टेंबरपासून 2 सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेसाठी अद्याप टीम इंडियाची घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जैसवाल ही सलामीची जोडी म्हणून निश्चित आहे. त्याचबरोबर शुभमन गिल तिसऱ्या आणि विराट कोहली चौथ्या क्रमांकावर खेळण्याची शक्यता आहे.