न्यूझीलंडने अनपेक्षितपणे बाजी मारल्याने सट्टेबाजांचे 100 कोटींचे नुकसान

18


सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या उपांत्य लढतीत हिंदुस्थानचे पारडे न्यूझीलंडपेक्षा जड मानले जात होते. त्यामुळे अर्थातच पैसा हिंदुस्थानी संघाच्या बाजूनेच अधिक लागलेला होता. मात्र या लढतीत न्यूझीलंडने अनपेक्षितपणे बाजी मारल्याने सट्टेबाजांचे 100 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिल्ली-एनसीआरच्या सट्टेबाजारात हिंदुस्थानच्या बाजूने पैसा लावल्याने अनेक जण डुबले. सट्टे बाजारात हिंदुस्थानसाठी 4.35 रुपये भाव होता, तर न्यूझीलंडसाठी 49 रुपये. याचाच अर्थ सट्टेबाजारात न्यूझीलंडचा पराभव गृहीत धरलेला होता. लक्ष्याचा पाठलाग करताना हिंदुस्थानने 6 बाद 200 धावसंख्येपर्यंत मजल मारलेली असताना व रवींद्र जाडेजा व महेंद्रसिंह धोनी खेळपट्टीवर असताना सट्टेबाजारात ‘टीम इंडिया’वर भरमसाट पैसे लावले जात होते. मात्र अखेरच्या दोन षटकांत सामना न्यूझीलंडकडे झुकला अन् सट्टेबाजांचे सारे हिशेब बिघडले.

न्यूझीलंडवर सट्टा लावणार्‍यांची चांदी

महेंद्रसिंह धोनी दुर्दैवीरीत्या धावबाद झाला अन् बहुतांश सट्टेबाजांचे मोठे नुकसान झाले, मात्र न्यूझीलंडवर सट्टा लावणार्‍यांची चांदी झाली. ‘टीम इंडिया’चे पहिले तीन फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर सट्टेबाजार बदलायला लागला. एका सट्टेबाजाने तर हिंदुस्थानचे चार फलंदाज बाद झाल्यानंतर न्यूझीलंडवर सगळा पैसा लावला. हा जुगार त्याच्यासाठी लॉटरीच ठरला.

आपली प्रतिक्रिया द्या