….आणि आचरे गाव गेलं पळून, वाचा काय आहे शेकडो वर्षांची ‘गावपळण’ परंपरा

2320

अमित खोत । मालवण

श्री देव रामेश्वराची तोफ धडाडली… बारापाच मानकरी यांनी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार दिंडी दरवाजा आतून बंद केला… मंदिराच्या पुढील दरवाजालाही कुलूप ठोकले… गगनभेदी तोफेचा आवाज कानी पडताच गावकऱ्यांनी गाव सोडला… आचरे ग्रामस्थ आपली घरंदारं बंद करून पाळीव प्राण्यांसह तीन दिवस तीन रात्रींसाठी वेशीबाहेर उभारलेल्या झोपडीत मुक्कामासाठी निघाले. सुमारे आठ हजारांच्यावर वस्ती असणारे बारा वाड्या आणि आठ महसुली गाव असलेले आचरा गाव गुरुवारी दुपार नंतर सुनासुना झाला.

सकाळ पासूनच आचरा तिठ्यावर लगबग वाढली होती. जो तो पळून जाण्यासाठी आतुरला होता. आचऱ्यातील बारावाड्यापैकी ज्या बाजूची वेस जवळची आहे त्याबाजूला वस्ती केली आहे. पारवाडी खाडी किनारी, भगवंत गड रस्त्यालगत राहुट्या उभारून ग्रामस्थांनी आपले वस्ती स्थाने बनवली आहेत. केवळ राहण्यासाठी आधार एवढ्याच उद्देशाने राहुट्या उभारल्या गेल्या नसून काहींनी आपल्या कल्पकतेने या राहुट्यांना आकर्षक साज चढविला आहे.

achre-village

संपूर्ण गाव निर्मनुष्य झाला तरी श्री देव रामेश्वराची दैनंदिन पुजा अर्चा सुरू राहणार आहे. गुरव, ब्राम्हण मंदिरात येऊन पुन्हा आपल्या निवासस्थानी वेशीबाहेर जातात. दुपारी आणि सायंकाळी मंदिरालगत वाजविला जाणारा चौघडा मंदिराच्या आवारात वाजविला जातो. यासाठी आवश्यक ग्रामस्थ गावात येऊन पुन्हा वेशीबाहेर जातात मात्र इतर कोणी तीन दिवस गावात येत नाही. गावपळणीचा आनंद घेण्यासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. यात तरूणाई मोठ्या संख्येने सहभागी आहे. शाळा कॉलेज बंद मात्र शासकीय कार्यालये निमित्तमात्र खुली राहणार आहेत.

आचरे गावात पिढ्यान पिढ्या चाललेली गावपळण दर चार ते पाच वर्षांनी होते. ग्रामस्थांच्या मते ही अंधश्रद्धा नसून आमची श्रद्धा आहे. यामुळे गावाचे वातावरण निरोगी बनण्यास मदत होते. अनेक वैज्ञानिक दृष्टीकोनामुळे गावपळण स्वच्छतेसाठी राबविलेली मोहिम म्हटल्यास वावगे ठरू नये.

archra

गावपळण कालावधीत ग्रामस्थांना 12 डिसेंबर पासून 14 डिसेंबर पर्यंत गावाच्या वेशीबाहेर रहावे लागणार आहे. रविवार 15 रोजी रामेश्वराने गावभरण्याचा कौल दिला तर पुन्हा गाव भरणार आहे. अन्यथा एक दिवस मुक्काम वाढणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या