त्वचा रोग डिप्लोमा कोर्स करणाऱ्या डॉक्टरची फसवणूक करणाऱ्याला अटक

रत्नागिरी शहरातील आरोग्य मंदिर येथील डॉक्टरला त्वचा रोग तज्ज्ञ डिप्लोमा कोर्ससाठी 15 लाख 10 हजार रुपये भरण्यास सांगून फसवणूक करणाऱ्याला शहर पोलिसांनी अटक केली. पुण्यातील या संशयिताला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

महेश विठ्ठल अदाते (42, रा. कल्पतरु इक्वीसाईट, कसपटे वस्ती, ता. वाकड, जि. पुणे) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना जून 2019 ते 10 मे 2022 या कालवाधीत घडली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमोल वासुदेव झोपे (39, रा. पर्णिका एंपायर, एन. ए. साळवी रोड, आरोग्य मंदिर -रत्नागिरी) यांना त्वचा रोग तज्ज्ञ (diplom in dermatology and vene reology) कोर्ससाठी संशयिताने पुण्यात प्रवेश करून देतो सांगून अमोल झोपे यांना विश्वासात घेतले आणि प्रथम त्याने त्यांच्या बॅंक ऑफ इंडिया शाखेच्या खात्यात आणि बॅंक ऑफ महाराष्ट्र खात्यावर 15 लाख 10 हजार रुपयांची रक्कम भरण्यास सांगितले.

झोपे यांनी संशयित अदाते यांच्या सांगण्यावरून आरटीजीएश, आयएमपीएस आणि गुगल पेद्वारे 12 लाख 60 हजार एवढी रक्कम तसेच उर्वरित रक्कम 2 लाख 50 हजार संशयिताने त्याचे वडील विठ्ठल अदाते यांच्या बॅंक ऑफ महाराष्ट्र खात्यात भरण्यास सांगितले. अमोल झोपे यांनी रक्कम बँक खात्यात भरली. पुढे त्वचा रोग तज्ज्ञ डिप्लोमा कोर्सला प्रवेश न देता व तसेच घेतलेली रक्कम परत न करता डॉ. अमोल झोपे यांची फसवणूक केली.

या प्रकरणी डॉ. झोपे यांनी 10 मे 2022 ला शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तपास शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भोसले करत होते. तपासात पोलिसांना डॉ. झोपे यांनी संशयित व त्याच्या वडिलांच्या बॅंक खात्यावर स्टेट बॅक ऑफ इंडिया व एचडीएसी बॅंक येथील खात्यावरून आरटीजीएस, आयएमपीएस व गुगल पेद्वारे रक्कम पाठविली असल्याचे स्टेटमेंट प्राप्त झाले आहे. संशयिताच्या बॅंक खात्यातील माहितीसाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. संशयिताचा शोध घेण्याकरिता पोलिसांनी पथक पाठवून वाकड-पुणे येथील पोलिसांची मदत घेऊन संशयितास बुधवारी (ता. 30) सकाळी साडेसात वाजता अटक केली. न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.