दाऊद इब्राहीमच्या लोटेतील मालमत्तेचा एक डिसेंबरला लिलाव

कुख्यात तस्कर दाऊद इब्राहीम कासकर याच्या खेड तालुक्यातील मुंबके येथील मालमत्तेच्या लिलावानंतर आता लोटे येथील मालमत्तेचा लिलाव केला जाणार आहे. खेड तालुक्यातील लोटे येथे दाऊदचे 150, 151, 152, 153 व 155 या क्रमांकेचे भूखंड असून या 30 गुठे भूखंडाची राखीव किंमत 61 लाख 48 हजार 100 रुपये निश्चित करण्यात आली आहे.

अंडरवल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचे मुळ गाव खेड तालुक्यातील मुंबके हे आहे. या ठिकाणी त्याचा एक बंगला आणि हापुसची बाग अशी मालमत्ता होती. या मालमत्तेचा केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून 10 नोव्हेंबर रोजी लिलाव करण्यात आला. दिल्ली येथील अॅडव्होकेट अजय श्रीवास्तव यांनी ही मालमत्ता 11 लाख 20 हजार रुपयांच्या बोलीने विकत घेतली.

मुंबके येथील मालमत्तेसह रत्नागिरी जिल्ह्यात दाऊद याच्या मालकीच्या सात मालमत्ता होत्या. 10 नोव्हेंबर रोजी झालेल्या लिलावादरम्यान त्या मालमत्तापैकी सहा मालमत्तांचा लिलाव करण्यात आला होता. मात्र लोटे येथील भुखंडाचा लिलाव काही कारणास्तव मागे घेण्यात आला होता. तो लिलाव आता 1 डिसेंबर रोजी होणार असून तो लिलाव देखील ऑनलाईन पद्धतीनेच होणार असल्याचे समजते.

आपली प्रतिक्रिया द्या