आमचं कोकण लय भारी…

517

>>आनंदराव का. खराडे<<

नोकरी मिळावी, पोटाची खळगी भरावी, मुलांचं शिक्षण व्हावं म्हणून आपण निसर्गरम्य कोकण सोडून शहरात आलो. सिमेंटच्या जंगलातही रमलो, राहिलो. कुशीत वाढलेलं आपलं बाळ परदेशी जाताना जन्मदात्या आईच्या हृदयाची होणारी कालवाकालव ‘बाळ जातो दूर देशा, मन गेले वेडावून, आज सकाळपासून…’ या कवितेतल्या काव्यपंक्ती आपण शाळेत शिकताना वाचल्या-ऐकल्या होत्या, परंतु आईची माया आणि बाबांची छाया सोडून निघताना आपलीही अवस्था तशीच झाली होती. एसटी सुटताना ‘पोहोचल्यावर पत्र धाड, गाडीघोडा सांभाळून प्रवास कर, आमका विसरा नको,’ अशा अनेक पटापट मागण्या करणारी अश्रूभरल्या नयनांनी आई विसरता येत नव्हती. त्यामुळे मुलांना शाळेची सुट्टी कधी पडते आणि गावी जातो कधी, अशी लगबग असे. शेजारी गावात गेला की, आमचो चाकरमानी खय दिसललो? म्हणून विचारणा व्हायची. ‘कावळो आराडता हा… पत्र येताला’ म्हणत पोस्टमनच्या वाटेकडे डोळे असायचे साऱ्यांचे. ‘बाबा, या वर्षी आपण मामाच्या गावाला जाऊया, भरपूर रानमेवा खाऊया’ अशी विनवणी मुले करीत असत.

मात्र तो काळ संपला. आता मोबाईलचे दिवस आले आणि घरबसल्या ताजी खुशाली मिळू लागली. ‘तुका आये वाचापता. (आठवण काढते), ह्या घालूच्या आदी भेटान जा’ असा फोन आला तरी तातडीने गाव गाठता येतो. कोकणात रेल्वे गेली आणि कोकणी माणसावर मेहेरबानी झाली. गावची ओढ असणारा गणपती, होळी-शिमगा आणि सुट्टी पाहून गावी जाऊ लागला. आम्ही आमच्या मुलांना पहिल्यापासूनच गावाची ओढ लावली आहे. ती ओढ आता सुना, नातवंडे यांनाही लागली. इंटरनेट, व्हॉटसऍप, चॅटिंगमध्ये गुंतलेल्या तरुणाईला आपणच ओढ लावायला हवी. आपली कुलदेवता, ग्रामदेवता, गावचे पूर्वजांचे घर आदींची आवड लावायला हवी. ‘गोमू गावाला जाते हो नाखवा, हिच्या घोवाला (नवऱ्याला) कोकण दाखवा… कोकणची माणसं साधीभोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी…’ या गाण्याची जाणीव, अर्थ या नवीन पिढीला समजावून सांगायला हवा. कोकणातल्या लाल मातीचा दर्प, रानफुलांची, फळांची दरवळ, हम्मा अशी हंबरणारी गोठ्यातली गाय, आमराईत कुहू कुहू कुंजन करणारा कोकीळ, हूप हूप करीत या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारणारे वानर, अंगणात पडणारा फुलांचा सडा, पहाटे कोंबड्याचे आरवणे, सकाळची पाखरांची किलबिल, आंब्याच्या झाडावरून टपटप पडणारे आंबटगोड आंबे, रसभरीत काजू बोंडे, काळीभोर जांभळं, करवंदे, लालभडक रतांबे (कोकम फळे), झाडावर लटकणारे फणस व त्यातील मधुर गरे. खाण्याची जणू चंगळच. रानमेव्यांची गोडी, समुद्र आणि नदीकाठची तर कधी तळी-हौदातली आंघोळ, आठवडे बाजारातल्या गमती आणि गरमागरम भज्यांचा घमघमाट. समुद्र चौपाटीवरची मौजमजा, ‘पॉटभर जेवा, मागून घेवा’ म्हणणारी आपुलकी, ‘पावन्यानूं, उद्या आमच्याकडे जेवक येवा हां’ म्हणणारा शेजारधर्म. गावातून निघताना एसटी स्टॅण्डवर पोहोचवायला येणारी हात उंचावत ‘परत कधी येतालास’ म्हणणारी भावुक हळवी मने, कोकणातला मोहिनी घालणारा निसर्ग, उंच डोंगर, हिरवी राने आणि वनराई, ताजे फडफडीत मासे, लाल तिखट झणझणीत कालवण तोंडाला पाणी सुटते. पाहुण्यांचा पाहुणचार हेच कोकणचे वैभव आहे. भजने, नाटक, गावजत्रा, दशावतार, नाट्य कला, गावजेवण, गणेशोत्सवात गावागावात भक्तिसागर जणू. हास्यवदनी सुगरणी, मायाळू माणसं, झाडाझुडपातून खळखळत वाहणारे पाण्याचे झरे. खूप आहे कोकणात. चाकरमान्यांच्या मनिऑर्डरकडे डोळे लावणारे कोकण आता स्वयंरोजगाराकडे वळले आहे. मुंबई शहराकडे वळणारा तरुण कोकणातच स्थिरावतो आहे. शहरात राहणाऱया कोकणी चाकरमान्यांनो, तुमच्या मुलाबाळांना कोकणची, मामाच्या गावाची, आजी-आजोबांच्या मायभूमीची ओढ लावा. नोकरी नसेल तर सिमेंटचे जंगल सोडा, गावातली वनराई बघा. कोकणचे वैभव पाहून तुमच्या मुलांनाही आनंद होईल तेव्हा तीच म्हणतील व मित्रांना सांगतील ‘आमचं कोकण लय भारी…’

 

 

आपली प्रतिक्रिया द्या