जगबुडी नदीला प्रदूषणाला विळखा; एका दिवसात दोन मगरींचा मृत्यू

खेड शहरातलगत वाहणाऱ्या जगबुडी नदीला पडलेला प्रदूषणाचा विळखा दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत चालला आहे. नदीपात्रातील प्रदूषणाबाबत वारंवार तक्रारी करूनही नगरपालिका प्रशासनाकडून नदीपात्रात गाळ काढण्याबाबत काहीच हालचाही नसल्याने नदीपात्रातील एकाच दिवशी दोन मगरींना आपला जीव गमवावा लागला आहे. इतकेच नव्हे तर नदीतील दूषित पाणी प्यायल्याने एक म्हैस आणि वासरू देखील नदीपात्रात मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

खेड शहरालगत वाहणारी जगबुडी नदी ही खेड शहराची ऐतिहासिक ओळख आहे. या नदीच्या डोहात मोठ्या प्रमाणात जलचर आहेत. यामध्ये महाकाय मगरींचा समावेश आहे. दिवसाढवळ्या या मगरी पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन तरंगत असताना दिसून येतात. या नदीच्या देवणे डोहात तर मोठ्या प्रमाणात मगरींचा संचार आहे. उन्हाळ्यात देवणे डोहाजवळील खडकावर अनेक मगरी पहुडलेल्या पाहावयास मिळतात. मात्र जलचरांसाठी त्यांचे हक्काचे अधिवास असणारी जगबुडी नदीच आता जलचरांसाठी काळ ठरू लागली आहे. नदीतील पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्याने नदीतील जलचर पटापट मरु लागले आहेत. मासे मरण्याच्या घटना तर वारंवार घडतच आल्या आहेत.

काही महिन्यांपूर्वी नदीपात्रात एक महाकाय मगर मृतावस्थेत आढळून आली होती. नदीपात्रातील मगरीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शोधण्याचा वनविभागाकडून प्रयत्न झाला होता. मात्र अद्याप नदीपात्रातील मगरी का मृत होत आहेत हे स्पष्ट झालेले नाही. दरम्यान एक दोन महिन्याने जगबुडी नदीपात्रात मगरींचा मृत्यू होऊ लागला आहे. आठ दिवसांपूर्वी भोस्ते पुलाजवळ एक मगर मृतावस्थेत आढळून आल्याची घटना ताजी असतानाच काल एक नव्हे तर दोन महाकाय मगरी मृतावस्थेत अधून आल्या आणि खळबळ उडाली. जगबुडी नदीला पडलेला प्रदूषणाचा विळखा हेच जलचरांच्या मृत्यूचे कारण ठरत असावे असा प्राथमिक अंदाज प्राणी मित्रांनी व्यक्त केला आहे.

नदीपात्रात मगरी मृतावस्थेत आढळून आल्याची चर्चा ताजी असतानाच भोस्ते पुलाजवळ एक म्हैस तर आणि एक वासरू मृतावस्थेत आढळून आला. त्यामुळे जगबुडीतील प्रदुषण आणखी किती मुक्या जनावरांचा बळी घेणार आहे. असा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही. चला जाणून घेऊ नदीला या उपक्रमांतर्गत आज जगबुडी परिक्रमण कार्यक्रमाचे आयोजन करण्यतात आले होते. खेड तालुक्यातील नानावले ते वडगाव या दरम्यान जलदूत समिती जगबुडीची पाहणी करणार आहेत. केंद्र सरकारकडून या उपक्रमासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. मात्र ही परिक्रमा म्हणजे आग सोमेश्वरी आणि बंब…… अशी परिस्थिती आहे. जगबुडी नदी खऱ्या अर्थाने गणेश विसर्जन घाटाजवळ प्रदूषित झाली आहे. गणेश विसर्जन घाटाजवळच्या डोहातच मगरी, म्हैस, वासरू मेलेल्या अवस्थेत दिसून आले आहेत. त्यामुळे गणेश विसर्जन घाटाजवळचा डोह प्रदूषणमुक्त करणे गरजेचे आहे.

जगबुडी नदीतील प्रदूषण ही खेडवासियांसाठी फार मोठी समस्या बनू लागली आहे. आता जलचर आणि मुक्या प्राण्यांच्या जीवावर बेतू लागले आहे. मात्र वेळीच जगबुडीला लागलेले प्रदूषणाचे ग्रहण सोडविले नाही तर उद्या नागरिकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही.