कोकण रेल्वे चोरांच्या हिटलिस्टवर, दागिन्यांचा मोह प्रवाशांना नडतो

24

सामना प्रतिनिधी । मुंबई

क्षणात हात साफ करून पटकन पसार होणे सहज शक्य असल्यामुळे चोर रेल्वेला जास्त टार्गेट करतात. पण त्यातही एकदा हात मारला की भरपूर ऐवज हमखास मिळणार हे नक्की असल्याने कोकण रेल्वे चोरांच्या हिटलिस्टवर आहे. कोकण व दक्षिण हिंदुस्थानात जाणाऱया एक्सप्रेसमधील प्रवासी लाखो रुपयांचे दागिने सोबत ठेवतात. शिवाय त्या मार्गावरच्या गाडय़ा काही ठरावीक ठिकाणी धिम्या होत असल्याने चोरी करून पळणे सहज शक्य होत असल्यामुळे कोकण रेल्वेला चोरांकडून पहिली पसंती मिळत आहे.

कोकण रेल्वे वर्षाची बाराही महिने फुल असते. शिवाय कोकणात किंवा दक्षिण हिंदुस्थानात जाणारे प्रवासी सोबत लाखो रुपयांचे दागिने घेऊन असतात. विशेष करून महिला प्रवासी त्यांचे किमती ऐवज पर्समध्ये ठेवून ती पर्स झोपताना डोक्याखाली ठेवतात. कोकण रेल्वेत हे नेहमीचे चित्र असते, पण दागिने सोबत घेऊन जाण्याचा मोह प्रवाशांना नडत असून चोरांच्या मात्र ते पथ्यावर पडत आहे. कोकण रेल्वे मार्गावरील एक्स्प्रेसचा वेग काही ठरावीक ठिकाणी खूपच धिमा होतो. त्यात रात्रीचा काळोख आणि एक्सप्रेस धिमी होते तेथे सीसीटीव्ही कॅमरेदेखील नसल्याने पळून जाणे सहज शक्य होते. या सर्व बाबींचा अभ्यास करून चोरांनी कोकण रेल्वेला हिटलिस्टवर आणले आहे. चोर मग ते कुठल्याही राज्यातील असोत चोरीसाठी कोकण रेल्वेलाच जास्त पसंती देतात, असे एका पोलीस अधिकाऱयाने सांगितले. आम्ही आतापर्यंत जेवढे चोर पकडले त्यांनी कोकण रेल्वेत मोठा हात मारला आहे. चोरी करण्याबरोबर पळून जाणे सोयीचे ठरत असल्यामुळे कोकण रेल्वे चोरांसाठी आंदण ठरत असल्याचेही ते म्हणाले. अनेक चोरांना गजाआड केल्याने चोरीचे प्रमाण घटल्याचेही त्यांनी सांगितले.

चोरी होण्याचे हॉटस्पॉट
पनवेल, दिवा, माटुंगा, सॅण्डहर्स्ट रोड, रत्नागिरी, रोहा, कणकवली, राजापूर या ठिकाणी थांबण्यासाठी किंवा तेथून निघताना एक्स्प्रेस धिमी असताना चोरी होते.

कशी होते चोरी
कोकण रेल्वेने प्रवास करणाऱया महिला प्रवासी मोठय़ा प्रमाणात सोबत दागिने ठेवतात हे चोरांना ठाऊक झाले आहे. महिला झोपताना दागिने ठेवलेली पर्स डोक्याखाली ठेवतात. रात्रीच्या काळोखात गाढ झोपेत असलेल्या महिला प्रवाशांच्या डोक्याखालची पर्स हिसकावून घ्यायची आणि कोणाला काही कळायच्या आत धावत्या एक्स्प्रेसमधून उडी टाकून पसार व्हायचे अशा प्रकारचे गुन्हे कोकण रेल्वे मार्गावर सर्रास घडतात.

कधी हात साफ केला जातो
रात्रीच्या किंवा पहाटेच्या अंधारात एक्स्प्रेस एका स्टेशनवर थांबण्यासाठी किंवा स्टेशनवरून सुटल्यानंतर धिम्या गतीत असते तेव्हाच चोरटे हात साफ करतात. कारण चोरी केल्यानंतर धावत्या एक्स्प्रेसमधून उडी टाकून पळणे सहज शक्य होते. शिवाय ज्या बाजूने पळणार त्या ठिकाणी सीसीटीव्ही नसतो हे चोरांच्या पथ्यावर पडते, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या