बोलीभाषेतील विनोदाने ‘कोकणचा बाज’ रंगभूमी गाजवणार !

327

सामना ऑनलाईन । संगमेश्वर  (जे. डी. पराडकर )

ज्या कार्यक्रमाची जाहिरातच ‘ हसा पण स्वतःच्या जबाबदारीवर ‘ अशी खुमासदार केली जाते तो संगमेश्वरी बोलीभाषेतील धमाल विनोदाने भरलेला कार्यक्रम नुकताच मठधामापूर येथील यात्रोत्सवात संपन्न झाला. भाषेतील गोडवा , विनोदाची जोड देवून सर्वांच्या अंतर्मनाला साद घालील अशा पध्दतीनं पोहचविण्यात समर्थकृपाचे कलाकार यशस्वी झाल्यानं उपस्थित हजारो प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले . पहाडी हास्यामुळे प्रेक्षकवर्ग काहीकाळ आपली सर्व दुख: विसरुन आनंदसागरात बुडाले. संगमेश्वरी बोलीतील ‘कोकणचा बाज, संगमेश्वरी साज ‘ हा हास्याचे पावलोपावली फवारे उडवणारा विनोदी कार्यक्रम महाराष्ट्रातील रंगभूमी गाजवणार यात शंका नाही .

प्रत्येकाला आपल्या भाषेचा अभिमान असतो . जिल्ह्याची हद्द बदलली की , बोलीभाषेत थोडा फरक पडतो. कोकणात तीन – चार प्रकारच्या बोलीभाषा बोलल्या जातात. यामध्ये सर्वाधिक लक्षवेधक बोलीभाषा म्हणून ‘ संगमेश्वरी बोली ‘ चा उल्लेख करावा लागेल . कोकणच्या रत्नागिरी जिल्ह्यातच खासकरून ही भाषा बोलली जाते. रत्नागिरी जिल्ह्यात कुणबी समाजाची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे . संगमेश्वरी बोलीभाषा ही या समाजात पुर्वपरंपरापार बोलली जाते . या भाषेचा प्रसार आणि प्रचार संगमेश्वर मधून सुरु झाला म्हणून या बोलीभाषेला ‘ संगमेश्वरी बोली असं संबोधले जावू लागले. या बोलीभाषेचा वापर कोकणचा सांस्कृतिक ठेवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नमनखेळे आणि जाखडी नृत्यात पूर्णतः केलेला आहे .

संगमेश्वर तालुक्यातील प्रभाकर डाऊल आणि सुनील बेंडखळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत समर्थकृपाच्या माध्यमातून संगमेश्वरी बोलीभाषा राज्याच्या कानाकोपऱ्यातून पोहचावी या उद्देशाने कोकणचाबाज , संगमेश्वरी साज हा धमाल विनोदी कार्यक्रम मोठ्या मेहनतीनं रंगभूमीवर आणला आहे . या कार्यक्रमाची जाहिरातच ‘ हसा पण स्वतःच्या जबाबदारीवर ‘ अशी सुरुवातीलाच एका निवेदनातून केली जाते , या वरुन या कार्यक्रमातील विनोदाच्या पखरणीची कल्पना येते . संगमेश्वरी बोलीत आपलेपणा बरोबरच जवळीकता साधण्याची ताकद आहे . या भाषेला अभिनयाची उत्तम जोड मिळाल्यामुळे आपले भाव समोरील व्यक्तीच्या अंतर्मनाला जावून भिडतात . कोकणचा बाज या कार्यक्रमात छोटे छोटे प्रसंग घेतले असल्यामुळे विनोदाला अधिक वाव मिळाला आहे . संगमेश्वरी बोलीभाषा तिरकस वाटली तरी तिला मोठा स्वाभिमानी बाणा आहे . प्रश्नाचं उत्तर प्रश्नात देण्याचा तिरकसपणा दिसला तरी , त्यामागे स्वाभिमान दडलेला असतो हे या भाषेत एकरुप झाल्यावर लक्षात येतं .

हसूनहसून बेजार होणाऱ्या प्रेक्षकांना संगमेश्वरी बोलीतील विनोद पटकन लक्षात येतात . या बोलीभाषेच्या जतनासाठी आणि यातील सहज घडणारे विनोद सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी समर्थकृपाचा हा प्रयोग निश्चितच यशस्वी झाला आहे . आता या कोकणीबाजाला राजाश्रय मिळाला तर , लोकाश्रय नक्की मिळेल याची खात्री आहे . कोकणचाबाज केवळ कोकणची रंगभूमी गाजवेल असं नव्हे तर आपल्या दर्जाच्या जोरावर राज्यात सर्वदूर पोहचेल असा विश्वास प्रभाकर डाऊल आणि सुनील बेंडखळे यांना वाटत आहे .

आपली प्रतिक्रिया द्या