रायगडमध्ये कॅम्लिन-कोकुयोचा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा प्रकल्प

47

सामना ऑनलाईन । रसायनी

कॅम्लिन-कोकुयो कंपनीच्या नव्या प्रकल्पाचे भूमिपूजन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते झाले होते तर उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणववीस यांच्या हस्ते रायगड जिल्ह्यातील रसायनीमध्ये पाताळगंगा येथे झाले. मेक इन इंडिया अंतर्गत हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या ठिकाणी सर्व स्टेशनरी वस्तूंचे उत्पादन (रंग, पेन, पेन्सिल) करण्यात येणार आहे.

कॅम्लिन आणि कोकुयो एकत्र येत नवीन इतिहास घडवतील आणि नवनवीन उत्पादन नागरिकांसाठी बाजारात आणतील असे कोकुयो कॅम्लिनचे अध्यक्ष दिलीप दांडेकर यांनी सांगितले. कंपनीच्या प्रकल्पाजवळ न्हावाशेवा बंदर आहे तसेच नवीन विमानतळ होत असल्याने देशातच नाही तर विदेशातही निर्यात करता येणार आहे असंही ते म्हणाले.

कॅम्लिन कंपनी १९३१ मध्ये स्थापन झाली. आधी फक्त शाईची निर्मिती करणारी ही कंपनी आता लहान मुलांसाठी उपयुक्त अनेक वस्तूंच निर्मिती करते. पाताळगंगा येथील प्रकल्पासाठी कॅम्लिनसोबत भागीदारीचा करार करणाऱ्या कोकुयो या जपानी कंपनीला ११० वर्षांचा इतिहास आहे. आता कॅम्लिन आणि कोकुयो कंपनी संयुक्तपणे लहान मुलांसाठी उपयुक्त अशा अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वस्तूंची निर्मिती करणार आहेत, असे कॅम्लिनचे अध्यक्ष दिलीप दांडेकर यांनी सांगितले.

याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्र्यांनी मुंबई ते रायगड दरम्यान औद्योगिक विकासासाठी जपान सरकार महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक करत असल्याचे सांगितले. महाराष्ट्र देशातील इतर राज्यांच्या तुलनेत औद्योगिक क्षेत्रात आघाडीवर आहे. वाढत्या लोकसंख्येसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती व्हावी यासाठी सरकार खासगी औद्योगिक प्रकल्पांना चालना देत आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. उद्घाटन सोहळ्याला आमदार प्रशांत ठाकूर, मनोहर भोईर आणि जपानचे भारतातील राजदूतही उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या