अंबाबाई भक्तांची बाजू लक्षात घेऊन श्रीपूजकांबाबत निर्णय घ्यावा – मुख्यमंत्री

22

सामना प्रतिनिधी । कोल्हापूर

करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिर ही पुरातन वास्तू आहे. पण, शासन आणि न्यायालयाचा आदेश धाब्यावर बसवून मंदिर परिसरात श्रीपूजक हटविण्यासाठी आंदोलने करणाऱ्यांवर कारवाई होत नाही. उलट श्रीपूजकांनाच हटविण्याची कार्यवाही करण्याची शासनाची भूमिका संदिग्ध आहे. त्यामुळे याप्रकरणी अंबाबाईच्या भक्तांची बाजू लक्षात घेऊन निर्णय घ्यावा, असे साकडे श्रीपूजक गजानन मुनिश्वर, अविनाश मुनिश्वर, रामकृष्ण मुनिश्वर, अभय मुनिश्वर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे निवेदनाद्वारे घालण्यात आले आहे.

श्री अंबाबाई मंदिरात देवीची पूजा-अर्चा, धार्मिक विधी यासह श्रीमूर्तीची सुरक्षा मुनिश्वर कुटुंबीय श्रीपूजक म्हणून पिढ्यानपिढ्या करीत असून, देवीच्या गर्भगृहाची जबाबदारीही श्रीपूजकांकडेच आहे. शासनाच्या वतीने प. महाराष्ट्र देवस्थान समितीकडे मंदिराच्या व्यवस्थापनाचे काम असले तरी कोणताही अभ्यास न करता या समितीने मंदिरात अनेक अयोग्य बदल केल्याचे न्यायालयीन निवाडेही उपलब्ध आहेत. सध्या मंदिरात ‘पुजारी हटाव’ आंदोलनाने मंदिराचे पावित्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न होत आहे. याबाबत देवस्थान समिती कोणतीही कारवाई करत नाही. तसेच समिती मंदिरात करत असलेली कामे भाविकांना अद्यापही दिसत नाहीत. याउलट श्रीपूजकांची ५४ कुटुंबे असून, प्रत्येक कुटुंबाला सात दिवसच देवीची सेवा करण्याची संधी मिळते. यामध्ये भक्तांकडून देवीसमोर येणाऱ्या दानावरच श्रीपूजकांचा उदरनिर्वाह चालतो. इतर दिवशी श्रीपूजकांचे कुटुंब अन्य व्यवसाय, नोकरी करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या