धोकादायक कोळंब पुलावरुन अवजड वाहतुक ‘गुन्हा’

36

सामना ऑनलाईन ।  मालवण 

कोळंब पूलास तडे गेले आहेत. त्यामुळे अवजड व एसटी वाहतूकीसाठी पुल धोकादायक बनल्याने मंगळवार पासुन वाहतुक बंद करण्यात आली. धोकादायक कोलंब पुलावरुन अवजड वाहनांची वाहतुक केल्यास तो कायदेशीर गुन्हा असल्याचा अहवाल प्रांताधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आला आहे. दरम्यान पुलाच्या दोन्ही बाजुला केवळ अडीज मिटर उंचीची लोखंडी कमान बांधकाम विभागाने आज बुधवारी उभारली. त्यामुळे ट्रक, टेम्पो, डंपर व एसटी आदी अडीज मिटर उंचीहून अधिकची वाहने पुलावरुन जावू शकणार नाही . केवळ दुचाकी, रीक्षा व कार अशीच वाहने पुलावरुन जावु शकणार आहेत. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम उप विभाग मालवणचे अभियंता  प्रकाश चव्हाण यांनी दिली आहे.

मंगळवारी पुलाच्या देवगड दिशेने कमान उभारण्यात आली आहे. गुरुवारी मालवणच्या दिशेने कामान उभारण्याचे काम पूर्ण होणार आहे.  तर पुलाच्या दुरुस्तीसाठी ३ कोटीचा निधी मंजुर झाला आहे. असे सांगताना लवकरच कामाला सुरवात होणार असल्याचे बांधकाम विभागाने स्पष्ट केले. तर ज्या आडारी पुलावरून आचरा, मसुरा व देवगड अवजड वाहतुक वळवण्यात ते पूलही जुने आहे. तसेच अरुंद आहे. मात्र धोकादायक नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र आडारी पुल वाहतुकीस योग्य असल्याचा लेखी अहवाल देण्याचे पत्र एसटी प्रशासनाने बांधकाम विभागास पाठवले आहे.

ग्रामस्थ आक्रमक 

सात महिन्या पूर्वी केलेल्या सर्व्हेत पूल धोकादायक असल्याचे उघड झाले होते. तरीही लोकप्रतिनिधींनसह सार्वजनिक बांधकाम विभाग सात महिने झोपा काढत होते काय? असा सवाल कांदळगाव दशक्रोशीतील सरपंचानी सार्वजनिक बांधकाम विभागास बुधवारी निवेदनाद्वारे केला आहे. या बाबत मालवण निवासी नायब तहसीलदार धनश्री भालचीम,तसेच मालवण आगर व्यवस्थापक संतोष बोगरे,यांना निवेदन सादर केले. यावेळी कोळंब सरपंच सुनील मलये,कांदळगाव सरपंच बाबू राणे,सर्जेकोट-मिर्याबांद सरपंच दाजी कोळंबकर,शशिकांत परब आदि उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या