कोल्हापूर – मातंग वसाहतीसाठी दिलेले भूखंड शासकीय बंधनातून मुक्त

छत्रपती शाहू महाराजांनी मातंग वसाहतीसाठी दिलेले भूखंड शासकीय बंधनातून मुक्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी घेतला आहे. लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षात आणि महात्मा गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत होत आहे.

कुमरी शेतकऱ्यांना वनजमिनी कायमस्वरूपी वहिवाटीचा हक्क, शाहूवाडीतील मौजे मरळे येथील 35 मागासवर्गीय कुटूंबांना मालकी हक्काने जमीन,चंदगडमधील हेरे सरंजाम जमिनीचा निर्णय आणि मौजे लिंगनुर दुमाला ग्रामस्थांसाठी भूखंडाच्या निर्णयानंतर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज हा आणखी एक निर्णय घेतला. यानुसार छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी कोटीतीर्थ येथे मातंग वसाहतीसाठी दिलेले भूखंड आता शासकीय बंधनातून मुक्त झाले आहेत. ‘ब’ सत्ता प्रकार नोंद कमी करुन ‘क’ सत्ता प्रकार करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

करवीरचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी याबाबत आज आदेश दिले.सध्याच्या मिळकत पत्रिकेवरुन कोणताही बोध होत नव्हता .कोणतेही कागदपत्रे उपलब्ध होत नव्हती. यासाठी पुराभिलेख कार्यालयामधून राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्या कालावधीतील कागदपत्रे शोधण्यात आली.छत्रपती शाहू महाराजांनी सन 1905 साली ही जागा या वसाहतीसाठी दिली होती.आजच्या आदेशाने 115 वर्षानंतर मालकी प्रस्थापित झाली. एकूण 88 मिळकत पत्रिकेवरील 400 हून अधिक भूखंडधारकांना याचा लाभ होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या