Video – रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून रुग्णाची आत्महत्या, कोल्हापुरातील प्रकार CCTV मध्ये कैद

खासगी रुग्णालयात उपचारासाठी  दाखल झालेल्या एका रुग्णाने गुरुवारी पहाटे पहिल्या मजल्यावरून उडी टाकून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली. जयसिंग ज्ञानदेव कणसे (वय – 48, रा. पुलाची शिरोली, ता. हातकणंगले) असे या रुग्णाचे नाव असून आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

घटनास्थळावरून तसेच पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मीपुरी येथील सूर्या रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी जयसिंग कणसे हे बुधवारी दुपारी दाखल झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना गुरुवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास रुग्णालयाच्याच्या पहिल्या मजल्यावरून त्यांनी उडी घेतली. डोक्याला वर्मी मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

हॉस्पिटल प्रशासनाकडून याबाबत तातडीने लक्ष्मीपुरी पोलिसांना माहिती देण्यात आली. तर मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआर मध्ये दाखल करण्यात आला. यावेळी हॉस्पिटल परिसरात बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. हा आत्महत्येचा प्रकार रुग्णालयाबाहेर लागलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.