कोल्हापूर – लोकाभिमुख कारभारातुन कायदा सुव्यवस्था अबाधित राखणार – पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे

कोणताही दबाव न घेता,जनतेला विश्वासात घेऊन लोकाभिमुख कामकाजास प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन नवे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले. तसेच पोलीस दलाच्या सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीद वाक्यप्रमाणे कर्तव्य पार पडणार असून,कोल्हापूर सारख्या पुरोगामी भूमीत काम करायला मिळणं हे माझं भाग्य असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

सध्या पुणे ग्रामीण येथे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणुन कार्यरत असलेले डॉ.अभिनव देशमुख यांच्यानंतर आज कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून शैलेश बलकवडे यांनी पदभार स्वीकारला.अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे,श्रीनिवास घाडगे आदी अधिकाऱ्यांनी बलकवडे यांचे स्वागत केले.यानंतर त्यांनी काही पत्रकारांशी संवाद साधला.

नूतन पोलीस अधीक्षक शैलेश बळकवडे हे पुणे जिल्ह्यातील शिरुर गावचे असुन,सन 2010 साली भारतीय पोलीस सेवेत रुजू झाले. त्यांची पहिलीच नेमणूक संभाजीनगर येथे झाली होती. त्यानंतर नगर व नागपूर येथे त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी सांभाळली होती. पदोन्नतीनंतर त्यांनी नागपूर ग्रामीण व गडचिरोली येथे पोलीस अधीक्षक म्हणुन काम केले.आता कोल्हापूर जिल्ह पोलीस प्रमुखाची जबाबदारी ते सांभाळणार आहेत. यापूर्वीचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या प्रमाणेच गुन्हेगारीवर अंकुश ठेवून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवुन कामकाज करणार असल्याचे बलकवडे यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील गुन्हेगारी व सर्व प्रकारच्या अवैध व्यवसायाची पाळेमुळे खणून काढले जातील. मोठ्या प्रमाणात वाढत चाललेल्या आर्थिक आणि सायबर गुन्ह्याला आळा घालण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच संघटित गुन्हेगारी मोडीत काढून गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा कायमस्वरूपी सुरूच ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कलंकित पोलिसांवर कारवाई करणार

अवैध व्यावसायिकांशी संबंधित आणि कर्तव्यात कसूर करून,पोलीस खात्याला कलंकित करणार्‍या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही बलकवडे यांनी दिला.तर उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य राहील,‌पोलीसांच्या कल्याणासाठी राबवण्यात येणार्‍या उपक्रमांना पाठबळ देण्यात येईल असे आश्वासनही बलकवडे यांनी यावेळी दिले.

आपली प्रतिक्रिया द्या