कोल्हापूर – विद्यापीठात ‘छत्रपती शिवाजी महाराज’ अभ्यास केंद्र सुरु करा, युवसेनेची मागणी

347

शिवाजी विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज अभ्यास केंद्र सुरु करा. तसेच चुकीच्या सेमिस्टर पद्धतीने लावलेला निकाल रद्द करावा अशी मागणी जिल्हा युवा सेनेच्या वतीने प्रभारी कुलगुरू करमळकर यांच्याकडे करण्यात आली.

आज छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व क्षेत्रातील न भूतो न भविष्य असे कार्य आणि वैचारिक बुद्धी, याची कल्पना पूर्ण जगाला आहे. हे कार्य जनसामान्य व्यति, भावी तरुण पिढी यांना अजून अधिक चांगल्या पद्धतीने माहिती व्हावे यासाठी महाराजांच्या नावाने एकमेव असलेल्या शिवाजी विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे अध्यासन केंद्र सुरु करा अशी मागणी करण्यात आली.

तसेच कोरोना महामारीमुळे परीक्षा घेण्यात अडचणी असल्याने पूर्वसत्रातील गुणांच्या आधारावर पदवीच्या कला, वाणिज्य व शास्त्र शाखेच्या प्रथम व द्वितीय वर्षाचा निकाल विद्यापीठाने लावलेला आहे. त्यात मनमानी पद्धतीने गुणांकन मिळाल्याने हजारो विद्यार्थी नापास झाले आहेत.

एखादा विद्यार्थी पहिल्या सेमिस्टरमध्ये एखाद्या विषयात अनुत्तीर्ण झाला तर त्याला दुसऱ्या सेमिस्टरला ही अनुत्तीर्ण दाखवले आहे. हे विद्यार्थी वर्गाच्या दृष्टीने अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे हा चुकीच्या पद्धतीचा निकाल रद्द करावा. अन्यथा हा विद्यार्थी वर्गा बाबतीत झालेला अन्याय खपवून घेणार नाही. याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे तक्रार करू असा इशाराही युवासेनेकडुन देण्यात आला.

यादरम्यान, लवकरच हे दोन्ही प्रश्न मार्गी लावु असे आश्वासन कुलगुरूंनी दिले. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख मंजीत माने, शीतल कालगोटे, पूनम पाटील, सुदेश आयरेकर, तुकाराम लाखे, साहिल जाधव, प्रसाद जामदार, अथर्व बापट आदी युवा सैनिक उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या