चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तोंडावर कुंबळे-कोहली यांच्यात मतभेद

72

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

इंग्लंडमधील आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या प्रारंभाला केवळ दोनच दिवस उरलेले असताना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यातील मतभेदांची कुणकुण सर्वांना लागली आहे. ४ जूनला परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सलामीच्या लढतीसाठी सज्ज होत असलेल्या हिंदुस्थानी संघातील या बेबनावामुळे देशातील क्रिकेटशौकिनांना मोठा धक्काच बसला आहे. कुंबळे यांच्या कडक शिकवणीवर आणि कठोर वर्तनावर टीम इंडियाचे सीनियर क्रिकेटपटू नाराज असल्याचे वृत्त तर क्रिकेटशौकिनांना बेचैन करणारे आहे. दरम्यान, संघातील ही फूट सांधण्यासाठी बीसीसीआयने तत्काळ क्रिकेट सल्लागार समिती सदस्यांना मध्यस्थी करण्याचे निर्देश दिले आहेत.

बीसीसीआयच्या प्रशासक समितीसमोर जाऊन खेळाडू, प्रशिक्षकाच्या पगारवाढीची मागणी करणाऱया कुंबळेवर बीसीसीआय आधीच नाराज  आहे. त्यामुळे त्यांनी नव्या मुख्य प्रशिक्षकाच्या निवडीसाठी अर्ज मागवून कुंबळेला सूचक इशाराच दिला आहे. तरीही मुख्य प्रशिक्षकाच्या शर्यतीत कुंबळेचेच पारडे जड असल्याची क्रिकेट जाणकारांचे म्हणणे आहे. २०१९ च्या विश्व चषकापर्यंत कुंबळेलाच प्रशिक्षक पदावर मुदतवाढ मिळेल असे वाटत असताना कुंबळे-कोहली मतभेदांनी कुंबळे आणि टीम इंडियाचे भवितव्य धोक्यात आले आहे. मुख्य प्रशिक्षक व सीनियर क्रिकेपटूंतील धुसफूस लवकर संपली नाही तर चॅम्पियन्स ट्रॉफीत संघाच्या कामगिरीवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो हे जाणून बोर्डाने याप्रकरणी तत्काळ मध्यस्थीसाठी पावले उचलली आहेत.

त्रिदेव घडवणार समेट

यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीत चमकदार कामगिरी साकारून विजेतेपद कायम राखण्यासाठी कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंडमध्ये गेली आहे. कर्णधार व मुख्य प्रशिक्षक यांच्यातील मतभेद संपविण्यासाठी हिंदुस्थानी क्रिकेटचे त्रिदेव आणि बीसीसीआय क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्य ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली व व्ही.व्ही.एस. लक्ष्मण हे याप्रकरणी लक्ष घालणार आहेत. कर्णधार विराट कोहली व मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्याशी संवाद साधून त्यांच्यातील मतभेद मिटवणार आहेत. हे मतभेद लवकरात लवकर मिटवणे टीम इंडियाच्या हिताचे ठरणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या