कोळी बांधवांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेऊ, पालिकेचा युक्तिवाद

costal-road

सामना प्रतिनिधी । मुंबई

कोस्टल रोडमुळे मच्छीमारीवर परिणाम होईल म्हणून कोळी बांधव विरोध करीत असले तरी कोळी बांधवांचे नुकसान होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत. त्यासाठी त्यांना योग्य तो मोबदला देण्यात येणार असून त्याबाबत सर्वेक्षण सुरू आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या वतीने आज उच्च न्यायालयात देण्यात आली.

कोस्टल रोडमुळे मच्छीमारांच्या व्यवसायावर परिणाम होणार असून पालिका तसेच राज्य सरकारने पर्यावरणविषयक परवानग्या घेतल्या नाहीत असा आरोप करीत वरळी-कोळीवाडा नाखवा आणि वरळी मच्छीमार सर्वोदय सहकारी सोसायटीच्या वतीने हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्राजोग आणि न्यायमूर्ती एन. एम. जामदार यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी घेण्यात आली. पालिकेच्या वतीने ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी बाजू मांडली.

ऍड. साखरे यांनी याचिकाकर्त्यांचे सर्व दावे फेटाळून लावले. कोस्टल रोडच्या कामामुळे कोळी बांधवांच्या उपजीविकेवर काहीही विपरीत परिणाम होणार नाही, असे त्यांनी न्यायमूर्तींना समजावून सांगितले. तसेच सागरी जैवविविधताही शाबूत राहणार असून कोस्टल रोडच्या कामामुळे त्याला धोका पोहोचणार नसल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास साखरे यांनी आणून दिले.