कोलकाता महापालिका निवडणूक : 2015 पेक्षाही मोठ्या विजयाच्या दिशेने ममतांची TMC

कोलकाता महानगरपालिकेच्या (केएमसी) निवडणुकीच्या मतमोजणीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला मोठी आघाडी मिळाली आहे. कोलकाता महापालिकेत तृणमूल काँग्रेसने 144 पैकी 17 जागा जिंकल्या आहेत, तर 118 जागांवर आघाडीवर आहे. रविवारी येथे मतदान झाले. राज्यातील सत्ताधारी पक्ष आपल्या जवळच्या प्रतिस्पर्धी भाजप आणि डाव्या पक्षांच्या पुढे आहे. भाजप आणि डावे प्रत्येकी तीन प्रभागात आघाडीवर आहेत. त्याचवेळी काँग्रेस केवळ दोन प्रभागात आघाडीवर आहे.

2015 च्या नागरी निवडणुकीत टीएमसीला 114 जागा मिळाल्या होत्या, यावेळी देखील टीएमसीला या आकड्याच्या जवळपास जागा मिळतील असे दिसते. त्याचवेळी गेल्या वेळेच्या तुलनेत यावेळी भाजप आणि डाव्यांच्या जागा कमी होताना दिसत आहेत. काँग्रेस चौथ्या क्रमांकावर कायम असून त्यांच्या जागा पूर्वीपेक्षा कमी होताना दिसत आहेत.

डावे आणि काँग्रेसने युती करून विधानसभा निवडणूक लढवल्यानंतर कोलकाता नागरी निवडणुका स्वतंत्रपणे लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. कोणत्याही पक्षाने नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. यावेळी तृणमूलच्या प्रमुख उमेदवारांपैकी एक आहेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या वहिनी कजरी बॅनर्जी. त्या प्रभाग क्रमांक 73, भवानीपूरमधून निवडणूक लढवत आहेत.

बंगाल भाजपने हिंसाचार आणि निवडणूक नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. रविवारी राज्य निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात, पक्षाने कोलकाता महानगरपालिका (केएमसी) निवडणुकांना एक तमाशा म्हटले आणि पोलीस हिंसाचार रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला. यापूर्वी तृणमूल काँग्रेसने भाजपवर एका प्रभागात बिर्याणी देऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता.

रविवारी मतदानादरम्यान तुरळक हाणामारीच्या घटना घडल्या. दोन मतदान केंद्रांवर बॉम्ब फेकण्यात आल्याची माहिती आहे.