मोदी पाकिस्तानचे राजदूत असल्यासारखे वागतात, ममता बॅनर्जींचा हल्लाबोल

नागरिकत्व सुधारित कायद्याविरोधात ( CAA ) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पुन्हा एकदा मैदानात उतरल्या आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. ‘मोदी पाकिस्तानचे राजदूत असल्यासारखे वागतात. तुम्ही हिंदुस्थानची तुलना नेहमी पाकिस्तानशी का करतात?’, असा सवाल त्यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे.

ममता बॅनर्जी पुन्हा एकदा आक्रमक दिसल्या. त्यांनी CAA ला पुन्हा विरोध दर्शवला. मोदींच्या भाषणांना त्यांनी यावेळी लक्ष्य केलं. मोदी हिंदुस्थानची तुलना नेहमी पाकिस्तानशी का करतात? तुम्ही हिंदुस्थानबद्दल बोललं पाहिजे. आम्हाला पाकिस्तान व्हायचं नाही. आम्ही हिंदुस्थानवर प्रेम करतो. ते पूर्ण दिवस पाकिस्तानबद्दलच बोलतात. पाकिस्तानची चर्चा पाकिस्तानने करावी. आपण हिंदुस्थानची चर्चा करू’, असे त्या म्हणाल्या .

‘हिदुस्थान आपली जन्मभूमी आहे. पण आता इतक्या वर्षांनंतर आपल्याला आपली नागरिकता पुन्हा एकदा सिद्ध करावी लागणार आहे. केंद्रीय गृहमंत्री म्हणतात देशात एनआरसी लागू करू आणि पंतप्रधान म्हणतात मला याबद्दल काहीच माहीत नाही’, असंही त्या म्हणाल्या.

ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या की ‘आम्ही प. बंगालमध्ये एनपीआरला परवानगी देणार नाही. आधी आम्हाला वाटलं होतं की हा जनगणनेचा भाग आहे, त्यानंतर आम्हाला कळलं की ते अन्य तपशील देखील मागणार आहेत. आमचा पत्ता पाकिस्तान नाही. आम्ही स्वतंत्र हिंदुस्थानचे नागरिक आहोत. आमचा अधिकार आमच्याकडून कोणी हिरावून घेऊ शकत नाही’, असंही त्यांनी स्पष्ट केली.

आपली प्रतिक्रिया द्या