कोलकाता येथील डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या केल्याप्रकरणी देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. दोषींना कठोरात कठोर शिक्षा मिळण्यासाठी देशभर आंदोलन केले जात आहे. तर डॉक्टर तरुणीच्या वडिलांनी नुकसान भरपाई घेण्यास नकार दिला आहे.
मी ही नुकसान भरपाई घेणार नाही. कारण त्याने माझ्या मृत मुलीला त्रास होईल. आपल्याला कोणतीही नुकसान भरपाई नको तर अधिकाऱ्यांकडून मुलीसाठी न्याय हवाय, डॉक्टर तरुणीच्या वडिलांनी सांगितले.
या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या केंद्रीय तपास यंत्रणेने गुरुवारी डॉक्टर तरुणीच्या कुटुंबाची भेट घेतली. पीडितेच्या वडिलांनी त्या भेटीत काय झाले हे सांगण्यास नकार दिला. पण ते म्हणाले की, सीबीआयने आम्हाला आश्वासन दिले की, आरोपीला लवकरत अटक केली जाईल.
इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने गुरुवारी जारी केलेल्या निवेदनानुसार, आधुनिक औषधांच्या डॉक्टरांनी शनिवारी, 17 ऑगस्ट रोजी सकाळी 6 ते रविवार, 18 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत देशभरातील त्यांच्या सेवा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.
कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये ड्युटीवर असताना 9 ऑगस्ट रोजी एका पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. त्यामुळे देशभरातील डॉक्टर संपावर जात आहेत आणि आंदोलन करत आहेत.