केंद्रिय तपास यंत्रणेने कोलकाता येथील आरजीकर मेडीकल कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष यांच्या घरावर रविवारी सकाळी छापेमारी केली. त्यांच्या कार्यकाळात महाविद्यालयात झालेल्या कथित आर्थिक अनियमिततेवरून हा छापा टाकण्यात आला होता. याशिवाय केंद्रिय तपास यंत्रणा 14 अन्य शहरांमध्ये तपास करत आहे. छापेमारी दरम्यान सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखेचे अधिकारी, आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील फॉरेन्सिक मेडिसिन आणि टॉक्सिकॉलॉजीचे प्रात्यक्षिक डॉ. देबाशीष सोम यांच्या घरीही पोहोचले.
आरजीकर मेडीकल कॉलेज आणि रुग्णालयाचे माजी उपाध्यक्ष अख्तर अली यांनी तीन दिवसांपूर्वी दाखल केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. तक्रारीत डॉ.देबाशीष सोम यांच्या विरोधात संस्थेमध्ये भ्रष्टाचार आणि अनियमितताचे आरोप लावण्यात आला होता. शनिवारी सीबीआयने कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई करत डॉ. संदीप घोष यांच्या विरोधात एफआयआर नोंदवला होता. उच्च न्यायालयाच्या एकल खंडपीठाने वैद्यकीय महाविद्यालयातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे आदेश तपास यंत्रणेला दिल्यानंतर तपासाला सुरुवात झाली. त्याआधी उच्च न्यायालयाच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) निजाम पॅलेस येथील सीबीआय कार्यालयाला भेट दिली आणि या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे दिली.
ही सूचना मिळाल्यानंतर त्वरित कारवाई करत सीबीआयने एफआयआर दाखल केला आणि शनिवारी अलीपूर मुख्य न्यायिक मॅजिस्ट्रट न्यायालयात त्याची एक प्रत जमा केली. कोलकाता न्यायालयाने सीबीआयला तपासाचा आतापर्यंतचा अहवाल द्यायला तीन आठवड्यांचा अवधी दिला आहे. जो 17 सप्टेंबरला दाखवायचा आहे.
कोलकाता येथील आरजीकर मेडीकल कॉलेजमध्ये 9 ऑगस्टला एका डॉक्टर तरुणीवर बलात्कार करुन तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. याप्रकरणात आरोपी संजय रॉय याला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. कोलकाता न्यायालयाच्या आदेशावर सीबीआयने हत्येबरोबरत कथित आर्थिक अनियमितता प्रकरणाची चौकशी दाखल केले होते. कोलकाता पोलिसांनी सरकारी आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलजवळील प्रतिबंधात्मक आदेश आणखी एका आठवड्याने 31 ऑगस्टपर्यंत वाढवले आहेत. 18 ऑगस्ट रोजी लागू करण्यात आलेल्या या आदेशांनुसार, निर्दिष्ट क्षेत्रात पाचपेक्षा जास्त लोक एकत्र येण्यास बंदी आहे.