Kolkata Murder Case: त्या रात्री कुकर्म्यानं आणखी एका महिलेचा विनयभंग केला, मैत्रिणीचे विवस्त्र फोटोही मागवले; सांगितला घटनाक्रम

कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेजमधील महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार प्रकरणाच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे सीबीआय चौकशीदरम्यान होत आहेत. याआधीच या प्रकरणाचा मुख्य आरोपी संजय रॉयने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. दरम्यान आता संजय रॉय याच्यासह सात जणांची पॉलिग्राफ चाचणी केली आहे. मात्र या प्रकरणाला आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.

सीबीआय चौकशीदरम्यान संजय रॉयने गुन्ह्याच्या रात्री काय काय केलं याचा घटनाक्रम सांगितला आहे. गुन्ह्याच्या रात्री संजय दोन रेड लाईट परिसरात गेला होता. तेथे जाण्यापूर्वी त्याने रस्त्यावरील एका महिलेचा विनयभंग केल्याचेही सांगितले. याचा पुरावा म्हणून सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, रॉयने खुलासा केला की त्याने त्याच्या मैत्रिणीसोबत व्हिडीओ कॉलवर बोलणं केलं आणि तिला तिचे विवस्त्र फोटो देण्यास सांगितले.

आरोपी संजय रॉयने सांगितला गुन्ह्यांचा घटनाक्रम-
– 8 ऑगस्ट- रॉय आपल्या मित्रासोबत त्याच्या भावाची चौकशी करण्यासाठी आरजी कार हॉस्पिटलमध्ये गेला होता.

– रात्री 11:15 वाजता- रॉय आणि त्याचा मित्र हॉस्पिटलमधून बाहेर पडले आणि दारू खरेदी केली. यानंतर रस्त्यावर मद्यप्राशन केले.

– यानंतर त्यांनी उत्तर कोलकातामधील सोनागाची या रेड लाइट परिसरात जाण्याचे ठरवले.

– मात्र सोनागाची येथे जाण्यास अयशस्वी ठरल्याने त्यांनी दक्षिण कोलकातामधील चेतला या रेड लाइट परिसरामध्ये जाण्याचा निर्णय घेतला.

– चेतला येथे जात असताना त्याने रस्त्यात एका मुलीचा विनयभंग केला.

– चेतला येथे त्याच्या मित्राने एका महिलेसोबत लैंगिक संबंध ठेवले तर रॉय बाहेर उभा राहून त्याच्या मैत्रिणीशी व्हिडिओ कॉलवर बोलत होता. रॉयने त्याच्या मैत्रिणीला न्यूड फोटो मागितले, जे तिने पाठवले.

– यानंतर रॉय आणि त्यांचे मित्र रुग्णालयात परतले. रॉय चौथ्या मजल्यावरील ट्रॉमा सेंटरमध्ये गेला.

– पहाटे 4 वाजता, रॉय तिसऱ्या मजल्यावरील सेमिनार हॉलजवळच्या कॉरिडॉरमध्ये जाताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.

– रॉयने सेमिनार हॉलमध्ये प्रवेश केला, जिथे पीडिता झोपली होती आणि तिचा गळा दाबला.

– रॉयने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला, त्यानंतर तो घटनास्थळ सोडून कोलकाता पोलीस अधिकारी अनुपम दत्ता याच्या मित्राच्या घरी गेला.

दरम्यान रॉयने उल्लेख केलेल्या सर्व ठिकाणी रॉय आणि त्याच्या मित्राची उपस्थिती असून याबाबत सगळे पुरावे गोळा करण्यात आले असल्याचे सीबीआयने सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी संजय रॉयच्या फोनमध्ये मोठया प्रमाणात अश्लील व्हिडीओ सापडले आहेत. ज्यामध्ये भावंडांमधील लैंगिक कृत्यांचे चित्रण करणाऱ्या व्हिडीओंचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे.