देशात दिवसाला 90 बलात्कार! ममता बॅनर्जींचे पंतप्रधान मोदींना पत्र, केल्या तीन मागण्या

कोलकाता येथील आरजी कर मेडीकल कॉलेजमधील डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून हत्या केल्याने संपूर्ण देश हादरला. अशातच पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देशात महिलांवर होणाऱ्या हिंसाचार प्रकरणी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी बलात्कार प्रकरणात आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी, अशी मागणी केली आहे. याबाबत ममता बॅनर्जी यांचे मुख्य सल्लागार बंधोपाध्याय यांनी याबाबत माहिती दिली आहे.

ममता बॅनर्जी यांनी पत्रात लिहीले आहे की, देशात बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे आणि आकड्यांनुसार अनेक प्रकरणात बलात्कार करून हत्या करण्यात आली आहे. देशभरात दरदिवशी 90 बलात्कार होत आहेत ही भयंकर परिस्थिती आहे. अशा घटनांनी समाज आणि राष्ट्राचा विश्वास डगमगतो. आपणा सर्वांचे कर्तव्य आहे की, आपण हे सर्व संपवून महिलांना सुरक्षित वाटू दे.

पुढे त्यांनी लिहीले की, अशा गंभीर आणि संवेदनशील मुद्द्यांवर सर्वसमावेशकपणे लक्ष देण्याची गरज आहे, असे त्यांनी लिहिले. ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदी यांना लिहिलेल्या पत्रात तीन मागण्या केल्या आहेत. यामध्ये गंभीर आणि क्रूर गुन्ह्यांना रोखण्यासाठी कठोर कायद्याची गरज आहे. दुसऱ्या मागणीत फास्ट ट्रॅक कोर्टात जलतगतीने सुनावणी व्हायला हवी आणि तिसऱ्या मागणीत 15 दिवसांच्या आत ट्रायल पूर्ण करायला हवे, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.