डॉक्टर बलात्कारप्रकरणी आंदोलनाला हिंसक वळण; कोलकात्यातील आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये तोडफोड

कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येविरोधात सुरू असलेले आंदोलन बुधवारी मध्यरात्रीनंतर आणखी पेटले. आंदोलनाला हिंसक वळण लागले. जमावाने पोलिसांचे बॅरिकेड्स तोडून कॉलेजमध्ये प्रवेश केला आणि रुग्णालयाच्या वॉर्डमध्ये घुसून तोडफोड केली. सुरुवातीला जमावाने पोलिसांच्या वाहनांची तोडफोड केली आणि दगडफेकही केली. अखेर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला आणि अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडल्या.  याप्रकरणी आतापर्यंत 12 जणांना अटक करण्यात आली आहे.

हल्लेखोरांची संख्या हजारांहून अधिक होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. जमाव मोठा असल्याने पोलिसांना गर्दीवर नियंत्रण ठेवता आले नाही. अखेर पोलिसांना लाठीमार करावा लागला आणि अश्रुधुराच्या नळकांडेय़ा पफोडाव्या लागल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. दरम्यान, प्रसारमाध्यमांनी चुकीच्या बातम्या पसरवल्यामुळे हिंसाचार घडला. कोलकाता पोलिसांविरोधात चुकीची मोहीम सुरू होती. त्यामुळे आदोलनाला हिंसक वळण लागल्याचा आरोप पोलीस आयुक्त विनीत गोयल यांनी केला.

पोलीस पळून गेल्याचा परिचारिकांचा आरोप

आंदोलनात इतर जमावाने सहभाग घेतल्याने आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचा आरोप परिचारिकांनी केला आहे. रुग्णालयाच्या आपत्कालीन इमारतीच्या तळमजल्यावर हिंसाचार झाला. मध्यरात्रीनंतर शेकडो लोक रुग्णालयात पोहोचले आणि आंदोलकांवर हल्ला केला. मध्यरात्रीच्या सुमारास हल्ला झाला. पोलिस आमच्यापेक्षा दुप्पट वेगाने पळून गेले. गुंडांनी आमच्यापैकी काहींना मारहाण केली आणि परिसराची तोडफोड केली. आम्ही दहशतीत आहोत आम्हाला संरक्षण हवे आहे, अशी मागणी परिचारिकांनी केली.

आरजी कार मेडिकल कॉलेजमधील बलात्कार आणि हत्येच्या घटनेच्या विरोधात बुधवारी रात्री 12 वाजल्यापासून देशभरात रिक्लेम द नाईटअंतर्गत आंदोलन सुरू झाले आहे.

गुंडगिरीच्या मर्यादा ओलांडल्या – अभिषेक बॅनर्जी

आरजी कार मेडिकल कॉलेजमधील तोडफोडीने गुंडगिरीच्या सर्व मर्यादा ओलांडल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी एक्सवरून केला. मी कोलकाता पोलीस आयुक्तांशी बोललो आहे आणि त्यांना या हिंसाचारासाठी जबाबदार असलेल्या प्रत्येकाची ओळख पटवण्यास सांगितले आहे. त्यांचा राजकीय संबंध असला तरीही आंदोलक डॉक्टरांच्या मागण्या रास्त आहेत. सरकारकडून त्यांना इतकी अपेक्षा करता येणार नाही का? त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले पाहिजे, असेही अभिषेक बॅनर्जी म्हणाले.