कोलकात्यात आज आयपीएलचा लिलाव; कोणावर लागणार सर्वाधिक बोली?

163

क्रिकेटच्या दुनियेतील सर्वात लोकप्रिय असलेली आणि लक्ष्मीचा वरदहस्त लाभलेली इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) या टी-20 क्रिकेटच्या मेगा इव्हेंटसाठी गुरुवारी (दि. 19) कोलकाता शहरात क्रिकेटपटूंचा लिलाव होणार आहे. या लिलावात 12 देशांतील 332 खेळाडूंवर बोली लागणार आहे. ‘आयपीएल’च्या इतिहासात प्रथमच दुपारी क्रिकेटपटूंच्या लिलावास प्रारंभ होणार आहे.

186 देशी, 143 परदेशी क्रिकेटपटू
‘आयपीएल’च्या 13 व्या सत्रासाठी 971 क्रिकेटपटूंनी नावनोंदणी केली होती. यात 713 हिंदुस्थानी व 258 परदेशी खेळाडूंचा समावेश होता. यातून 332 क्रिकेटपटूंची अंतिम यादी तयार करण्यात आली असून यात 186 देशी आणि 143 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. शिवाय यंदाच्या लिलावात 14 वयापासून ते 48 वयापर्यंतच्या खेळाडूंवर बोली लागणार आहे. यात अफगाणिस्तानचा नूर अहमद हा 14 वर्षांचा असून महाराष्ट्राचा प्रवीण तांबे हा 48 वर्षाचा आहे. शिवाय या लिलावात ‘आयसीसी’च्या असोसिएट सदस्य असलेले तीन खेळाडूही सहभागी झाले आहेत. अमेरिका आणि स्कॉटलंड या देशातील क्रिकेटपटू प्रथम ‘आयपीएल’च्या लिलावात सहभागी होत आहेत.

या पाच गोलंदाजांसाठी चढाओढ
दक्षिण आफ्रिकेचा डेल स्टेन, ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स, दक्षिण आफ्रिकेचा ख्रिस मॉरिस, मुंबईचा जयदेव उनाडकट आणि वेस्ट इंडीजचा शेल्टन कॉट्टरेल या वेगवान गोलंदाजांना आपल्या संघात घेण्यासाठी ‘आयपीएल’ फ्रेंचाईजींमध्ये चढाओढ रंगणार आहे.

रॉबिन उथप्पाला सर्वाधिक किंमत
हिंदुस्थानी क्रिकेटपटूंमध्ये अनुभवी रॉबिन उथप्पासाठी सर्वाधिक दीड कोटी रुपये आधारमूल्य ठेवण्यात आले आहे. गतवर्षी 8 कोटी 40 लाख रुपये किंमत मिळालेल्या जयदेव उनाडकटची यावेळी एक कोटी रुपये आधारभूत किंमत ठेवण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल व पॅट कमिन्स व दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिस यांची आधारभूत किंमत 2 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. याचबरोबर इंग्लंडचा जेसन रॉय (1.5 कोटी), वेस्ट इंडीजचा शिमरॉन हेटमायर (50 लाख), इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करण (एक कोटी) व दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर (75 लाख) यांनाही लिलावात मोठी किंमत मिळण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या