कोलकाता विजयाच्या हॅटट्रिकसाठी आतूर; हैदराबादकडून आज जोरदार टक्कर मिळणार

कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) व सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी ईडन गार्डन स्टेडियम्सवर जोरदार टक्कर बघायला मिळणार आहे. कारण केकेआरचा संघ विजयाच्या हॅटट्रिकसाठी आतूर झाला आहे. दुसरीकडे मागील लढतीत पंजाबवरील विजयाने मनोबल उंचावलेल्या हैदराबादकडून पलटवार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मोहालीमध्ये पंजाब किंग्जकडून पराभूत झाल्यानंतर केकेआरने लागोपाठ दोन विजय मिळविले. या दोन्ही लढतींत केकेआरचा संघ पिछाडीवर होता. मात्र बंगळुरूविरुद्ध शार्दुल ठाकूरने 81 धावांची वादळी खेळी केली, तर गुजरात टायटसन्सविरुद्ध रिंकू सिंगने अखेरच्या पाच चेंडूंवर लागोपाठ षटकार ठोकून केकेआरला संस्मरणीय विजय मिळवून दिला होता.

हैदराबादचा संघ कागदावर मजबूतच

एडेन मार्करमच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादला तीनपैकी एकच सामना जिंकता आला असला तरी कागदावर हा संघ तसा मजबूतच आहे. हॅरी ब्रुक, मयंक अग्रवाल व हेन्रीक क्लासेन असे मॅचविनर खेळाडू या संघाच्या दिमतीला आहेत. या संघाकडे अनेक टी-20 विशेष खेळाडू आहेतच, पण त्यांना पहिल्या दोन लढतींत छाप सोडता आलेली नव्हती. मागील पंजाबविरुद्धच्या लढतीत राहुल त्रिपाठीने नाबाद 74 धावांची खेळी करीत हैदराबादला जिंकून दिले होते. शिवाय वॉशिंग्टन सुंदर व मयंक मार्कंडेय यांच्या रूपाने दोन प्रतिभावान फिरकीपटूही हैदराबादकडे आहेत. भुवनेश्वर कुमार व मार्को यानसन ही वेगवान जोडगोळीही केकआरची दुर्दशा करण्याची क्षमता बाळगून आहे. त्यामुळे उद्या क्रिकेटप्रेमींना एक तुल्यबळ लढत बघायला मिळणार.