घरच्या मैदानावर कोलकाताचे पारडे जड

42

सामना ऑनलाईन । कोलकाता

मोजक्या खेळाडूंच्या साह्याने कोलकाता नाईट रायडर्सची टीम ( केकेआर) या स्पर्धेत उतरली त्यावेळी या टीमचे ‘जुने दिवस परत येणार का?’ हा प्रश्न विचारला जात होता. त्यातच केकेआरला सुरुवातीलाच मिचेल स्टार्क दुखापतीमुळे आऊट झाल्याचा मोठा फटका बसला. तरीही दिनेश कार्तिकच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या या टीमने महत्त्वाच्या क्षणी कामगिरी उंचावत स्पर्धेच्या ‘प्ले ऑफ’ मध्ये प्रवेश केला आहे.

आता राजस्थान रॉयल्स विरुद्ध खेळताना घरच्या मैदानावर कोलकाताचे पारडे जड आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात कामगिरी उंचावली आहे. तसेच इडन गार्डनवर राजस्थान रॉयल्सविरुद्ध सातपैकी सहा लढतीमध्ये कोलकाताने विजय मिळवलाय.

दिनेश कार्तिकने कोलकाताच्या फलंदाजी भार उत्तम रित्या पेलला आहे. तर कोलकाताचा फिरकी मारा इडन गार्डन्सवर नेहमीच वरचढ ठरलाय. असे असले तरी राजस्थान रॉयल्सकडे कर्णधार अजिंक्य रहाणे, संजू सॅमसन आणि हेन्री क्लासनेन हे फिरकीला उत्तम खेळू शकणारे फलंदाज आहेत. कोलकाताच्या नरिन-कुलदीप-चावला या फिरकी त्रिकुटाला उत्तर देण्यासाठी राजस्थानकडे गौतम-गोपाळ-सोधी असे त्रिकूट आहे. याच त्रिकुटाने शनिवारी बलाढ्य आरसीबीची शिकार केली होती.

राजस्थाने मुंबई इंडियन्स आणि आरसीबी या दोन बलाढ्य संघावर मात करत ‘प्ले ऑफ’मध्ये प्रवेश केलाय. तर मर्यादीत रिसोर्सेच्या आधारावरही कसे जिंकता येते हे कोलकाताने दाखवून दिलंय. दोन्ही संघाकडे गमावण्यासारखे काहीच नसल्याचे इडन गार्डन्सवर होणारा हा एलिमिनेटरचा सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे.

टीम न्यूज

कोलकाता आणि राजस्थान हे दोन्ही संघ तीन स्पिनर्सच्या ताफ्यासह मैदानात उतरण्याची शक्यता आहे. दोन्ही टीम्सनी शेवटच्या लढतीमध्ये सफाईदार विजय मिळवलाय. या विजयी संघात बदल होण्याची शक्यता कमीच आहे.

संभाव्य ११

कोलकाता नाईट रायडर्स

१) सुनील नरीन २) ख्रिस लिन ३) रॉबिन उथप्पा ४) नितीश राणा ५) दिनेश कार्तिक ६) आंद्रे रसेल ७) शुभमन गिला, ८) जे.सियरल्स, ९) कुलदीप यादव १०) पियूष चावला ११) प्रसिद्ध कृष्ण.

राजस्थान रॉयल्स

१) अजिंक्य रहाणे २) राहुल त्रिपाठी ३) संजू सॅमसन ४) हेन्री क्लासनेन ५) स्टुअर्ट बिन्नी ६) जोफ्रा आर्चर ७) कृष्णप्पा गौथम ८) श्रेयस गोपाळ ९) जयदेव उनाडकत १०) धवल कुलकर्णी ११) ईश सोधी

आपली प्रतिक्रिया द्या