कोलकाता पोलिसांकडून मोहम्मद शमीचा फोन जप्त

39

सामना ऑनलाईन । कोलकाता

पत्नी हसीन जहाँने केलेल्या गंभीर आरोपांमुळे हिंदुस्थानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा पाय आणखी खोलात अडकत चालला आहे. कोलकाता पोलिसांनी हसीनच्या तक्रारीवरून मोहम्मद शमीचा मोबाईल फोन जप्त केला असून त्याच्याकडे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील भटकंतीचा तपशील मागितला आहे.

शमीवर आरोप करताना हसीन जहाँने शमीचे इतर मुलींसोबतच्या संभाषणाचे स्क्रिनशॉट आपल्या फेसबुक अकाऊंटवर टाकले होते. त्यामुळे या प्रकरणात शमीच्या मोबाईलमधील कॉल डिटेल्स आणि अन्य गोष्टींचा तपास करणे गरजेचे असल्याचे कोलकाता पोलिसांनी सांगितले आहे.

‘टीम इंडिया’ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असताना मोहम्मद शमी कुठे बाहेर फिरायला गेला होता का? किंवा संघासोबत नसताना तो कुठे कुठे जायचा? याबद्दल माहिती घेण्यासाठी कोलकाता पोलिसांनी ‘बीसीसीआय’कडेही तपशील मागवला आहे. ‘बीसीसीआय’कडून प्रतिसाद मिळाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे कोलकाता पोलीस दलाचे सहपोलीस आयुक्त प्रवीण त्रिपाठी यांनी म्हटले आहे. मात्र कोलकाता पोलिसांनी पाठवलेल्या पत्रावर ‘बीसीसीआय’ने अजूनही ठाम भूमिका न घेता सावध पवित्रा घेतला आहे. त्यामुळे या शमी-हसीन प्रकरणी आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात हे बघावे लागेल.

आपली प्रतिक्रिया द्या