Kolkata Rape News – कोलकातामधील घटनेत तरुणीवर सामूहिक बलात्कार? डॉक्टरच्या दाव्याने खळबळ

कोलकाता येथील डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून हत्या केल्याने देशात संतापाची लाट उसळली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास न्यायालयाने सीबीआयकडे सोपवला आहे. आता या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. शवविच्छेदन अहवालावरून एका डॉक्टरने मोठा दावा केला आहे. डॉक्टर तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला आणखी नवे वळण मिळाले आहे.

अखिल भारतीय सरकारी डॉक्टर संघाचे अतिरिक्त महासचिव डॉ. सुवर्ण गोस्वामी यांनी हा दावा केला आहे. त्यांनी शवविच्छेदन अहवाल वाचला आहे. डॉक्टर तरुणीच्या गुप्तांगात 151 ग्रॅम लिक्विड आढळून आल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. एवढे सिमेनचे प्रमाण एका माणसात असू शकत नाही. अहवालानुसार या भयंकर गुन्ह्यात अनेकांचा सहभाग असू शकतो. डॉक्टर तरुणीच्या शरीरावर ज्याप्रमारे जखमा आहेत आणि जेवढी ताकद तिच्यावर लावली आहे, हे कोणा एका व्यक्तीचे काम असू शकत नाही. शिवाय तिच्या कुटुंबीयांनाही तिच्यावर सामूहीक बलात्कार झाल्याचा संशय आहे, असा दावा डॉ. गोस्वामी यांनी केला आहे. या घटनेत एकच आरोपी असल्याचा कोलकाता पोलीसांचा दावा डॉक्टर गोस्वामी यांनी खोडून काढला आहे.

डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून हत्या केल्याने या प्रकरणाच्या तपासावर सुरुवातीपासूनच प्रश्न उपस्थित केले जात होते. एवढी मोठी घटना घडल्यानंतरही सेमिनार हॉल उघडे ठेवण्यात आल्याचा आरोप आंदोलक डॉक्टरांनी केला आहे. त्यामागील कारण तेथे दुरुस्तीचे काम करायचे होते. मात्र दुरुस्तीचे काम सेमिनार हॉलच्या शेजारील खोलीत केले जाणार होते. सेमिनार हॉलमध्ये सीसीटीव्ही कॅमेराही नव्हता. हा एक प्रकारचा निष्काळजीपणा आहे. सेमिनार हॉलसमोरील बांधकामावरही डॉक्टरांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.