भाजपचा मेळावा म्हणजे कोकणातला दशावतार!

मुंबई – एकेकाळी लाल किल्ल्यावर भाषण केलं म्हणून पंतप्रधान होत नाही असे म्हणणारे आज स्वत:ला पांडव म्हणत असतील तर तेही पांडव ठरत नाहीत. त्याचप्रमाणे कुणी स्वत:ला कृष्ण म्हणवून घेतलं म्हणून कृष्णही होता येत नाही. आपण केवढे, आपण स्वत:ला कुणाची उपमा देतोय? हे सगळंच हास्यास्पद असून भाजपचा हा मेळावा म्हणजे कोकणातील दशावताराचा खेळ होता, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या बगलबच्चांचे ‘वस्त्रहरण’ केले.

शिवरायांच्या महाराष्ट्रात गुंडांचा मुख्यमंत्री अशी ओळख नको!

भाजपच्या मेळाव्यात शिवसेनेवर खंडणीचे आरोप करण्यात आले या प्रश्नावरही उद्धव ठाकरे यांनी सडेतोड उत्तर दिले. ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आजूबाजूला गुंडांची संख्या वाढत आहे. त्यामुळे त्यांची जी चांगली प्रतिमा होती ती आता मलीन झाली आहे. त्यांची प्रतिमा गुंडांचा मुख्यमंत्री, गुंडांचा नेता अशी होते की काय असे वाटू लागलेय. मला भाजपबद्दल काही बोलायचं नाही, पण माझ्या शिवरायांच्या महाराष्ट्राबद्दल जर असा समज झाला तर ती बाब फार वाईट ठरेल.

आता मला असं वाटतं, सर्वांचे मुखवटे उतरले आहेत आणि खरे थापाडे चेहरे समोर आले आहेत.

महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते काँठोसचे नगरसेवक देवेंद्र आंबेरकर यांच्यासह काँठोस, राष्ट्रवादी, मनसे आणि भाजपमधील प्रमुख पदाधिकाऱयांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या बेगडी पारदर्शकतेची पिसे काढली.

शिवसेनेने उपस्थित केलेल्या पारदर्शकतेच्या मुद्दय़ावर भाजप काहीच बोलत नाही याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता उद्धव ठाकरे म्हणाले, आहे का त्यांच्याकडे उत्तर? पारदर्शकतेचा जो मुद्दा मी मांडला त्यावर कुणीच काही बोलायला तयार नाही.

आता राम मंदिराच्या विटा गोळा करताहेत

उत्तर प्रदेशमध्ये भाजपने पुन्हा एकदा राम मंदिर बांधण्याची घेषणा केली आहे. यावर फटकारे ओढताना उद्धव ठाकरे म्हणाले, बाबरी पडल्यानंतर तेव्हा जे पळाले होते ते आता पुन्हा हळूहळू एकत्र येण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना आता वाटतंय की केंद्रात आता आपले सरकार आलेय. तेव्हा त्यावेळी जमा केलेल्या विटा आता पुन्हा सापडताहेत का, याचा शोध ते घेत असतील. त्या विटा जर का त्यांना सापडल्या तर कदाचित राम मंदिर बांधतील. (प्रचंड हशा)

भाजप कायदेशीररीत्या राम मंदिर बांधू असे म्हणतेय असे पत्रकारांनी विचारले असता, आता कुणी त्यांना विचारत नाही मंदिर वही बनायेंगे, मगर कब? अच्छे दिन कब आयेंगे? आता मला असं वाटतं, सर्वांचे मुखवटे उतरले आहेत आणि खरे थापाडे चेहरे समोर आले आहेत, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

आधुनिक हिंदुस्थान घडवायचा आहे

आम्हाला आधुनिक हिंदुस्थान घडवायचा आहे. चांगला महाराष्ट्र, मुंबई घडवायची आहे. त्यामुळे पाचशे फुटांपर्यंतच्या घरांना सवलत, विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा, मोफत आरोग्यसेवा या सेवाभावी वृत्तीनेच आम्हाला पुढे जायचे आहे. मुंबई तसेच ठाणेकरांना जे वचन दिले आहे ते पूर्ण करायचे आहे. त्यानुसार इतर महापालिकांमधील वचननामेही आम्ही लवकरच जाहीर करणार आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

आम्ही करून दाखवले ते मुद्दे खोडून दाखवा

आतापर्यंत तुम्ही आमच्यावर प्रेम करीत आलात, आशीर्वाद देत आलात. मी शिवसैनिकांना सांगितलंय की त्यांना काय टीका करायचीय ती करू द्यात, तुम्ही चांगले मुद्देs घेऊन लोकांसमोर जा. आम्ही जे करून दाखवलेलं आहे ते दाखवलेलं आहेच. म्हणून ते होर्डिंगच्या स्वरूपात आम्ही मांडत आहोत. ते मुद्दे खोडून दाखवा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले.

मला भीती वाटते, माझा घसा बसेल!

शनिवारी भाजपचा विजय संकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावर पत्रकारांनी विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले, मला त्या विषयावर फार बोलायचं नाही. मला भीती वाटते माझा घसा बसेल, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. यावेळी एकच हशा पिकला. मुख्यमंत्र्यांकडून औकातीची भाषा केली जात असल्याबद्दल पत्रकारांनी छेडले असता, तमाम मुंबईकर जनताच त्यांना योग्य ते उत्तर देईल, असे उद्धव ठाकरे यांनी फटकारले.

आपली प्रतिक्रिया द्या