कोकणातील डॉल्फिन दर्शन

 

योगेश नगरदेवळेकर

[email protected]

डिसेंबर महिना सुरू झाला की, पर्यटनाचे वेध चालू होतात. दरवर्षीप्रमाणे कोकणात एक ट्रिप असतेच. यावेळेस कोकण ट्रिपचं एक स्पेशल कारण होतं ते म्हणजे ‘डॉल्फिन दर्शन.’ दापोऴीजवळ असलेले मुरूड, कर्दे, हर्णे बीच डॉल्फिन सफारीसाठी प्रसिद्ध आहेत.

साधारण डिसेंबर ते एप्रिल हा प्रजनन कालावधी असल्याने ते खोल समुद्रातून किनाऱ्यावर येतात. या काऴावधीत स्थानिक लोक बोटीतून डॉल्फिन सफारीचे आयोजन करतात. घोळक्याने पोहणारे आणि मध्येच पाण्याच्या बाहेर सुंदर अशी उडी मारणारे डॉल्फिन बघणं खरंच खूप आनंददायी असतं. आपण सरसकट डॉल्फिन मासा असं म्हणतो, पण वस्तुतः तो मासा प्रजातीतला नसून पाण्यात राहणारा सस्तन प्राणी आहे. म्हणजे वटवाघूळ पक्ष्यांसारखं उडतं, पण तो पक्षी नसून उडणारा सस्तन प्राणी आहे. अगदी तसंच. पण पाण्यात राहण्यासाठी निमुळतं शरीर, वल्हवण्यासाठी शेपटी असे माशासारखे अवयव विकसित झाल्याने तो माशासारखा दिसतो इतकंच.

मानवासारखाच डॉल्फिन हा सामाजिक प्राणी आहे. तो एका कळपाचा सदस्य असतो. हा कळप १० – १२ डॉल्फिनचा असतो. सभोवतालची परिस्थिती चांगली असेल आणि अन्नाची मुबलकता असेल तर याचा कळप हजार डॉल्फिनपर्यंतही जाऊ शकतो. कळपाची मेंबरशिप फिक्स नसते. एखादा सहजपणे एका कळपातून दुसऱ्यात जाऊ शकतो.

वेळप्रसंगी दोन कळप एकत्रसुद्धा होतात. हा त्यांचा जथा एखाद्या मोठय़ा कुटुंबासारखा असतो. त्यांच्यात अतिशय चांगऴे भावनिक बंध निर्माण होतात. त्यांच्यातील आजारी किंवा जखमी डॉल्फिन ते सोबत ठेवतात आणि त्यांना कळपाच्या मध्ये ठेवून त्याचे संरक्षणदेखील करतात. अशा कमकुवत डॉल्फिनची आस्थेने काळजी घेतात. अशा प्रकारचे वर्तन माणूस आणि हत्तीनंतर फक्त डॉल्फिनमध्येच आढळते. मासे पाण्यातला ऑक्सीजन कल्ल्यांद्वारे वेगळा करतात. परंतु डॉल्फिनला याप्रकारे ऑक्सिजन वेगळा करणारी पद्धत नसल्याने त्याला ठराविक कालावधीनंतर समुद्राच्या पृष्ठभागावर यावेच लागते. एखाद्या आजारी डॉल्फिनला स्वतःहून पृष्ठभागावर येता येत नसेल तर इतर त्याला पृष्ठभागावर आणून श्वास घेण्यास मदत करतात.

हे फक्त स्वजातीतील सदस्यांना मदत करतात असं नाही तर काही प्रकारच्या व्हेल माद्या आणि त्यांच्या पिल्लांनासुद्धा मदत करतात असे आढळून आले आहे. समुद्रात पोहणाऱ्या माणसांच्या भोवती गोल रिंगण करून माणसांना शार्क माशापासून वाचवल्याच्यासुद्धा घटना नोंदविल्या गेल्या आहेत. एकाच्याही बाबतीत तर शार्क माशांवर हल्ला केल्याचेही नोंदवले गेले आहे. भक्ष्य पकडण्यासाठी डॉल्फिन विशिष्ट प्रकारच्या कंपनलहरी सोडतात. भक्ष्यावर आपटून त्या लहरी परत येतात. त्याचा अंदाज घेऊन भक्ष्य कुठे आहे आणि किती लांब आहे हे त्यांना समजते. मग तशाचप्रकारचे संदेश जवळच्या डॉल्फिनला पाठवून भक्ष्याचा पाठलाग केला जातो.

डॉल्फिनचं अजून एक महत्त्वाचं वैशिष्टय़ म्हणजे त्यांची एकमेकांशी संवाद साधण्याची कला. एक विशिष्ट प्रकारची शीळ तो वाजवतो. मनुष्य एकमेकांना चेहऱ्याने ओळखतो तसेच डॉल्फिन एकमेकांना त्यांच्या या शिटीने ओळखतात. म्हणजे काऴांतराने माणसाचा चेहरा बदलू शकतो व आपल्याला ती व्यक्ती ओळखणं कठीण होतं. परंतु डॉल्फिनची शिटी वर्षानुवर्षे तशीच असल्याने आपल्या ओळखीच्या डॉल्फिनला ते काही दशकांनंतरसुद्धा ओळखू शकतात. याच शिटीच्या मदतीने ते जवळपास 20 कि.मी. परिघातील इतर डॉल्फिनबरोबर संवाद साधू शकतात. नुसत्या आवाजानेच नाही तर ते स्पर्शाने पण एकमेकांशी संवाद साधतात. स्पर्श करून, अंग घासून ते आपल्या भावना एकमेकांना पोहोचवतात. लहान डॉल्फिनला कृतीतून शिकवणे आईचे काम असते.

मादी डॉल्फिन एका पिलाला जन्म देते. जन्म दिल्यावर ती लगेच त्याला श्वास घेण्यासाठी पृष्ठभागावर घेऊन येते. साधारणपणे ११ महिने ते २ वर्षे बाळाचे संगोपन केला जाते. त्यानंतर ते पिलू आईबरोबर साधारण आठ वर्षांपर्यंत सोबत राहते. डॉल्फिनला पाण्यात सूर मारत पोहताना बघणे एक पर्वणीच असते. त्याच्या अशा उडय़ा मारण्याची विविध कारणे आहेत. अशा प्रकारे पोहल्यामुळे हवेतून जातानाचे घर्षण पाण्यातल्या घर्षणापेक्षा कमी असल्याने लांबचा प्रवास करताना त्यांच्या ऊर्जेची बचत होते हे महत्त्वाचे कारण. तसेच अशा उडय़ा मारल्याने दिशादर्शन, कळपाच्या एकत्रपणाचे दर्शन अशी वेगळी कारणे पण आहेतच. अशा या माणसासारख्या बुद्धिमान प्राण्याला बघण्यासाठी यावर्षी नक्कीच कोकणला भेट द्या.

आपली प्रतिक्रिया द्या