
दापोली दाभोळ मार्गावरील दापोली जालगाव रस्त्याची अतिशय दयनिय अवस्था झाली आहे. रस्त्यात मोठया प्रमाणात खड्डे पडले आहेत त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी गणेशोत्सवापूर्वी रस्त्यातील खड्डे बुजवून रस्ता वाहतुकयोग्य करावा अन्यथा कोणतीही पूर्व सुचना न देता रस्त्यात पडलेल्या खड्डयांमध्ये जाहीरपणे वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात येईल असा इशारा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जालगाव विभाग प्रमुख आणि शिवसेना पदाधिकारी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी निवेदनाव्दारे दिला आहे.
दापोली तालूक्यातील दाभोळ या ऐतिहासिक बंदराकडे जाणारा मार्ग दापोली शहरातून पुढे जालगाव मार्गे दाभोळ या गावाकडे जातो. या मार्गावर दापोली ते जालगाव दरम्यान खड्डयांचे साम्राज्य वाढले आहे. त्यामुळे रस्त्यात खडृडे की खड्डयात रस्ता अशाप्रकारचा प्रश्न या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशाला वाटल्याशिवाय राहत नाही. चार दिवसांवर गणेशोत्सव येवून ठेपला आहे. कोकणवासीयांच्या या श्रध्देच्या आणि आनंदाच्या सणापूर्वी या मार्गावरील खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीस सुयोग्य करावा अन्यथा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने खड्डयात वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात येईल. याबाबतची कोणत्याही प्रकारची कायदेशीरबाब निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम विभागाची राहील अशाप्रकारचा इशारा लेखी पत्राव्दारे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आला आहे.
शिवसेना विभाग जालगाव विभागाचे विभाग प्रमुख शैलेश पांगत यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी निवेदन देण्यात आले यावेळी दापोली शहर प्रमुख आणि नगरसेवक संदिप चव्हाण, जालगाव उप विभाग प्रमुख विरेंद्र लिंगावले, जालगाव ग्राम पंचायतीचे माजी उपसरपंच विकास लिंगावले, जालगाव शाखाप्रमुख राजेंद्र चोरगे,मिलिंद शेठ,शिरीष देसाई,मंगेश भैरमकर,मंगेश भाटकर,उमेश बागडे, शिर्दे गावचे सुनिल जागडे,उंबर्ले ,शाखाप्रमुख प्रमोद जाधव,समिर पालवणकर,रामचंद्र काष्टे, पंकज भाटकर,नागेश मयेकर आदी उपस्थित होते.