नारळी पौर्णिमेचा नारळ समुद्रात पडला तरी समुद्र खवळलेलाच, समुद्र शांत होण्याची मच्छिमारांना अजून वाट पाहावी लागणार

हर्णे येथील समुद्रात उठलेले तुफान अजूनही शांत होण्याचे काही दिसत नाही. त्यामुळे मच्छिमारांना खवळलेला समुद्र शांत झाल्यानंतरच मासेमारीस समुद्रात जावे लागणार आहे.

रत्नागिरी जिल्हयातील हर्णे बंदर हे मच्छिमारीसाठी दुस-या क्रमांकाचे बंदर ओळखले जाते. या बंदरात सकाळ संध्याकाळ असे दोन वेळा मासळीची लिलाव प्रक्रीया पार पडत असल्याने मासळीच्या उलाढालीचे हर्णे बंदर प्रमुख केंद्र आहे. सध्या या बंदरात मासळीची उलाढाल पूर्णपणे ठप्प असल्याने बंदरात पूर्णपणे शुकशुकाट असल्याचे पहावयास मिळत आहे.

माशांचा प्रजनन काळ लक्षात घेता शासनाकडून जुन जुलै हे दोन महिने मासेमारी बंदीचा काळ म्हणून निर्धारित करण्यात येतो त्यानंतर 31 जुलैअखेर शासनाकडून मासेमारी बंदी काळ उठवून 1 ऑगस्टपासून मासेमारीस अधिकृत परवानगी देण्यात येते. त्यानुसार शासनाने जाहीर केलेला मासेमारी बंदीचा काळ संपुष्टात येवून आज 11 दिवस झाले तरी तसेच नारळी पौर्णिमेचा समुद्राला शांत होण्यास नारळ अर्पण केला गेला तरी अजूनही समुद्रात उठलेले तुफान काही शांत झालेले नाही. अदयापही समुद्र खवळलेलाच आहे. त्यामुळे समुद्र शांत होईपर्यंत मासेमारांना मासेमारीसाठीची प्रतिक्षाच करत बसावे लागणार आहे.

हवामान विभागाने वातावरणातील बदलाचा वर्तविलेला अंदाज खरा ठरला असल्याने 1 ऑगस्टपासून कोसळणारी पावसाची संततधार आणि त्यात वादळसदृष्य निर्माण झालेली परिस्थिती 11 ऑगस्टपर्यंत तरी अजूनही जैसे थेच आहे. त्यामुळे मासेमारीस समुद्रात जाणे पोषक वातावरण राहीलेले नाही. सतत या ना त्या कारणाने वातावरणात होणारे बदल हे समुद्रात सध्या तुफान उठवत असल्याने भरतीच्या उधानाला तर जोर आहेच शिवाय समुद्रात उठत असलेल्या तुफानाच्या मोठमोठया लाटा या मासेमारीस हानीकारण असल्याने शासनाचा निर्धारित दोन महिण्याचा माशांच्या प्रजनन काळाचा कालावधी संपुष्टात येवूनही अदयापही बदलत्या वातावरणाचा चांगलाच फटका मासेमारांना बसला आहे त्यामुळे समुद्र शांत होण्यासाठीची वाट पाहत त्यांना बसावे लागणार आहे.

कधी मानव निर्मित तर कधी निसर्ग निर्मित संकटाने आधीच हर्णे बंदरातील मासेमार हा आर्थिकदृष्टया अडचणीत आलेला आहे. त्यात आता मासेमारीच्या शुभारंभालाच मासेमारांना तब्बल 11 दिवस मासेमारीविना राहावे लागले आहे. श्रावण आणि भाद्रपद महिण्यात येणारे सण उत्सव हे मासेमारी व्यवसायामुळे येथील मासेमारांना नेहमीच सुगीचे जातात त्याने सण उत्सव कुटूंबात चांगल्या आणि आनंदी वातावरणात साजरे करता येतात मात्र सध्या समुद्र शांत होण्याचे नाव काही घेत नसल्याने हर्णे बंदरातील नोंदणीकृत 850 बोटी या समुद्रात मासेमारीस जाण्याच्या प्रतिक्षेत आहेत. मासेमारी होत नसल्याने त्याचा थेट परिणाम येथील हर्णे बाजारपेठवर झाला असून बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल पुर्णपणे ठप्प पडली आहे. त्याचा फटका पुढील सण उत्सव साजरे करण्यास बसणार असून बैकांचीसुध्दा चलनवाढ चांगलीच मंदावली आहे. त्यामुळे एक तर सोने दागीने बॅंकांमध्ये तारण ठेवून किंवा ऋण काढून सण साजरे करण्याची नामुष्की येथील मच्छिमारांवर ओढवणार आहे.