बारावीच्या परीक्षेत कोकणच पुन्हा अव्वल, कोकण बोर्डाचा निकाल ९४.८४ टक्के

127

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक क्षिण मंडळ पुणेच्या वतीने घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल आज संकेतस्थळावर जाहीर झाला. बारावीच्या निकालामध्ये कोकणातील हुषार विद्यार्थ्यांना याची ‘साथ’ मिळाली आहे. सलग सातव्या वर्षी कोकण विभाग राज्यात अव्वल ठरला. कोकण विभागाचा निकाल ९४.८५ टक्के लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल ९४.२२ टक्के आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल ९६ टक्के लागला आहे.

बारावीचा निकाल आज दुपारी १ वाजता संकेतस्थळावर जाहीर झाला. त्यानंतर कोकण विभागीय शिक्षण मंडळाच्या कार्यालयात मंडळाच्या सहसचिव भावना राजनोर यांनी पत्रकार परिषदेत कोकण बोर्डाचा निकाल जाहीर केला. कोकण बोर्डातून ३३,०५८ विद्यार्थ्यांपैकी ३३,०३९ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी ३१,३३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. रत्नागिरी जिल्ह्यातून २१,४३१ विद्यार्थ्यांपैकी २१,४२० विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी २०,१८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ११,६२७ विद्यार्थ्यांपैकी ११,६२१ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी ११,१५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९१.८९ टक्के आहे. ११,११५ मुलांपैकी ११,१०८ मुले परीक्षेला बसली. त्यापैकी १०,२०७ मुले उत्तीर्ण झाली आहेत. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९६.७३ टक्के आहे. १०,३१६ मुलींपैकी १०,३१२ मुली परीक्षेला बसल्या. त्यापैकी ९,९७५ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९४.१९ टक्के आहे. ५,८७६ मुलांपैकी ५,८७१ मुले परीक्षेला बसली. त्यापैकी ५,५३० मुले उत्तीर्ण झाली आहेत. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९७.८४ टक्के आहे. ५,७५१ मुलींपैकी ५,७४८ मुली परीक्षेला बसल्या. त्यापैकी ५,६२४ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

कोकणातील मुले-मुली आघाडीवर
संपूर्ण राज्यात निकालामध्ये कोकणातल्या मुलींनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. कोकण बोर्डातील मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९७.१३ टक्के आहे. कोकण बोर्डात १६,०६० मुली परीक्षेला बसल्या. त्यापैकी १५,५९९ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. कोकणातील मुलांनीही राज्यात आघाडी घेतली आहे. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९२.६९ टक्के आहे. कोकण विभागात १६,९७९ मुले परीक्षेला बसली. त्यापैकी १५,७३७ मुले उत्तीर्ण झाली आहेत.

कोकणला याची ‘सात’
२०१२ मध्ये कोकण विभागीय मंडळाची स्थापना झाली आणि कोकणच्या हुषार विद्यार्थ्यांनी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले. सलग सातव्या वर्षी कोकण विभाग राज्यात अव्वल ठरला आहे.
२०१२ पासून कोकणचा इतिहास

वर्ष         टक्के
२०१२     ८६.२५
२०१३     ८५.८८
२०१४     ९४.८५
२०१५     ९५.६८
२०१६     ९३.२९
२०१७     ९५.२०
२०१८     ९४.८५

विभागनिहाय निकाल
विभाग        टक्के
कोकण       ९४.८५
कोल्हापूर     ९१.००
पुणे           ८९.८८
संभाजीनगर  ८८.७४
लातूर        ८८.३१
अमरावती   ८८.०८
नागपूर      ८७.५७
मुंबई        ८७.४४
नाशिक       ८६.१३

कोकण बोर्डाचा शाखानिहाय निकाल
शाखा         टक्के
विज्ञान        ९७.९६
कला          ८८.४२
वाणिज्य       ९७.५७
एमसीव्हीसी   ९१.०८

रत्नागिरीच्या गायत्री करंदीकरला ४ विषयात पैकीच्या पैकी
रत्नागिरीतील अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील वाणिज्य शाखेच्या गायत्री उदय करंदीकर हिला ९६ टक्के गुण मिळाले आहेत. संस्कृत, अकाऊंटन्सी, गणित या तीनही विषयांत १०० पैकी १०० गुण आणि पर्यावरण शिक्षण या विषयात तीने ५० पैकी ५० गुण मिळवले आहेत. ६५० पैकी तिला ६२४ गुण मिळाले आहेत. दहावीच्या परीक्षेतही तिला ९७ टक्क्यांहून आधक गुण मिळाले होते. भविष्यात सीए व्हायचे तिचे स्वप्न असून ती आतापासूनच अभ्यास करत आहे. रत्नागिरीतील अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेत शिकणाऱ्या सिमरन नितीन रेडीज हिने कॉम्प्युटर सायन्समध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. तिला एकूण ९२.९२ गुण मिळाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या