खेड – दोन अल्पवयीन मुलींची आत्महत्या, आत्महत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात

तालुक्यातील अस्तान कातकरी वाडी येथील एका घरात दोन अल्पवयीन मुली मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. भारती हिलम (15) आणि साक्षी निकम (12) अशी या दोन मुलींची नावे असून त्या दोघींनी कोणते तरी विषारी द्रव्य घेऊन जीवन संपवले असावे असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. ही घटना बुधवार दिनांक 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास घडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

आस्तान कातकरी वाडीत राहणारे किसन हिलम व त्यांची पत्नी हे दोघे नेहमीप्रमाणे कामानिमित्त सकाळीच घराबाहेर पडले होते. किसन हिलम यांचे वृद्ध वडील हे आजारी असल्याने ते मात्र घरीच होते. आई बाबा कामावर गेले तेव्हा किसन यांची मुलगी भारती ही घराबाहेर गेली होती. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास भारती आणि तीची मैत्रीण साक्षी या दोघी घरी आल्या. बाहेर बसलेल्या आजोबाना आम्ही आतमध्ये जाऊन कपडे बदलणार असल्याचे सांगून त्यांना घरी येण्यास मज्जाव केला.

आजारी असलेले आजोबा घराच्या पडवीत झोपले होते. इतक्यात या दोन्ही मुली दरवाजा उघडून बाहेर आल्या आणि अचानक बेशुद्ध होवून जमिनीवर कोसळल्या. कपडे बदलण्यासाठी घरामध्ये गेलेली आपली नात भारती आणि तिची मैत्रिण साक्षी या दोघीं अचानक बेशुद्ध होवून जमीनीवर कोसळल्याचे पाहून भारतीचे आजोबा हादरून गेले.

काहीतरी विपरीत घडल्याचं लक्षात येताच त्यानी शेजाऱ्यांना बोलावले. परिस्थितीचे गांभिर्य ओळखून शेजाऱ्यांनी तात्काळ त्या दोघांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्या दोघींनाही मृत घोषीत केले.

भारती आणि साक्षी या दोघींच्या नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोघीही एकमेकीच्या अतिशय जिवाभावाच्या मैत्रिणी होत्या. दोघीही नेहमी आनंदी असायच्या मात्र तरीही त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलावे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान खेड पोलिसांनी घटनास्थळी जावून या घटनेचा पंचनामा केला असून नातेवाईकांचे जाब-जवाब नोंदविण्यास सुरवात केली आहे. एकाच वेळी दोन जीवाभावाच्या मैत्रीणीनी आपले आयुष्य का संपवावे याचा पोलीस शोध घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या