सांगिर्डेवाडीत आज होणार गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना कोकणातील आगळा वेगळा गणेशोत्सव

kudal-sagirdewadi-ganpati

गणेशोत्सवाबाबत अनेक परंपरा पाहावयास मिळतात. अशीच एक अनोखी परंपरा सिंधुदुर्ग जिह्यातील कुडाळ – सांगिर्डेवाडी येथील साळगांवकर कुटांबीय वर्षानुवर्षे जोपासत आहेत. सर्वजण भाद्रपद शुद्ध चतुर्थीला म्हणजेच श्री गणेश चतुर्थी दिवशी सार्वजनिक आणि घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना करून पूजन करतात. मात्र कुडाळ सांगिर्डेवाडीतील कृष्णा शंकर साळगांवकर यांच्या निवासस्थानी गणेश चतुर्थीच्या पाचव्या दिवशी नवीन गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. या गणपती बाप्पाचे वर्षभर भक्तीभावाने पूजन केले जाते. साळगांवकर कुटुंबीयांचा अनोखी परंपरा जपणारा हा कोकणातील गणेशोत्सव आगळा वेगळा आणि वैशिष्टय़पूर्ण ठरत आहे.

गणेश चतुर्थीच्या पाचव्या दिवशी बुधवार दि. 26 ऑगस्ट रोजी सायंकाळी मागील वर्षभर ठेवण्यात आलेल्या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर नवीन गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करून विधीवत पूजा करण्यात येणार आहे. नवीन गणेश मुर्ती तयार करण्यात आली आहे. या मुर्तीचे रंगकाम करून प्रतिष्ठापना केली जाणार असल्याचे कृष्णा साळगांवकर यांनी सांगितले.

सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह सुरू आहे. सर्वत्र गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी घरोघरी गणपती बाप्पांचे आगमन झाले आहे. कोकणात गणेशोत्सव मोठया उत्साहात भक्तीभावाने साजरा केला जातो. यावर्षी कोरोनाचे सावट असले तरी घरोघरी त्याच उत्साहाने गणेशोत्सव साजरा केला जात आहे. कोकणात गणेशोत्सवाबाबत अनेक परंपरा पाहावयास मिळतात. अशीच एक अनोखी परंपरा हे साळगांवकर कुटूंबीय जपत आहे. या गणेश मुर्तीचे चतुर्थीच्या पहिल्या दिवशी पूजन न करता पाचव्या दिवशी मागील वर्षभर घरात ठेवलेल्या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर नवीन गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना करून पूजन केले जाते.

हा गणपती बाप्पा वर्षभर ठेवला जातो. साळगांवकर यांची आर्थिक परिस्थिती थोडी बेताची आहे तरीही हे कुटूंबिय मनोभावे गणेशाची विधीवत पूजा, आराधना करतात. दररोज पूजा, आरती यासारखे नित्याचे कार्यक्रम घरात वर्षभर होतात. साळगांवकर कुटूंबियांचा पाच पिढय़ांचा वारसा जपणारा हा गणेशोत्सव कोकणात वैशिष्टय़पूर्ण ठरत आहे. माघी गणेश जयंती हा उत्सवही साजरा केला जातो. साळगांवकर कुटूंबिय आपल्याला वर्षभरात मिळालेले सर्व आर्थिक उत्पन्न हा आपल्या घरातील गणेशाचाच आशिर्वाद आहे असे मानून नोकरी व्यवसायातून आलेले सर्व आर्थिक उत्पन्न सर्वप्रथम या गणरायाच्या चरणी ठेवून नंतर त्याचा स्वखर्चासाठी वापर करतात. गणेशमुर्ती बनविण्यासाठी वैभव व विपुल या दोन्ही मुलांचेही सहकार्य लाभत असल्याचे कृष्णा साळगांवकर यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या