
छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम बालेवाडी पुणे येथे फर्स्ट टेक चॅलेंज आंतरराष्ट्रीय रोबोटीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये आर. जी. पवार माध्यमिक शाळा माटवण ता. दापोलीच्या विद्यार्थ्यांनी यशस्वी सहभाग घेतला . या स्पर्धेमध्ये देशातून दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, बंगलोर, गोवा, सुरत, लडाख, आसाम इत्यादी हिंदुस्थानी संघांसोबतच रोमानिया, कझाकिस्तान, इस्रायल, रशिया इ. देशातील असे एकूण 71 संघ सहभागी झाले होते . माटवण हायस्कूलच्या एकूण 13 विद्यार्थ्यांच्या चमूने या स्पर्धेत भाग घेतला आणि खूप कमी वेळात गतवर्षीप्रमाणे यावर्षीही चमकदार कामगिरी केली . 6 पैकी 3 सामने जिंकून या स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवला. रोमानिया सोबत खेळताना अप्रतिम खेळाचे प्रदर्शन घडवत सामन्यावर रोमहर्षक विजय मिळवला. त्याचप्रमाणे रायझिंग स्टार या मानाच्या पुरस्कारासाठी संघाला नामांकन देखील मिळाले .
या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणे ही अत्यंत खर्चिक बाब असून थोर स्वातंत्र्य सैनिक स्व. आर. जी. पवार यांचे नातू , इन्फिनिटी एक्स कंपनीचे एमडी अश्विन सावंत यांचे याकरिता बहुमोल सहकार्य लाभले. तसेच श्रीराम शिक्षण संस्था माटवण व सहभागी विद्यार्थ्यांच्या पालकांनी देखील आर्थिक मदत केली. शाळेतील इयत्ता दहावीची बॅच 1992 , बॅच 1989 व शाळेतील शिक्षक अविनाश महाडिक यांनी स्पर्धेकरिताविद्यार्थ्यांना विशेष गणवेश उपलब्ध करून दिले. स्पर्धेपूर्वी शाळेत जयेश गौतम यांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले. प्रत्यक्ष स्पर्धेदरम्यान श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विजय पवार यांच्या बहुमोल मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला.
अतिशय दिमाखात पार पडलेल्या या स्पर्धेसाठी अमेरिकेहून आलेले फर्स्ट कंपनीचे सीईओ विल्यम्स प्लासमदी यांनी देखील विद्यार्थ्यांची मनापासून प्रशंसा केली. सूर्यदत्ता कंपनीकडून विद्यार्थ्यांना हिंदुस्थानचा तिरंगा, चषक व सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले. स्पर्धेकरिता संघाचे कोच म्हणून ग्रंथपाल विवेक महाडिक यांनी तर मेंटॉर म्हणून मानसी विवेक महाडिक व सलोनी महाडिक यांनी काम पाहिले. या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक कोंडीकीरे यांनी विद्यार्थी, कोच व मेंटॉर यांचे विशेष कौतुक केले . त्याचप्रमाणे या यशाबद्दल माटवण व टांगर पंचक्रोशीतून विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे