‘सामना’च्या वृत्ताने खळबळ; बातमीवर चर्चा करण्यासाठी ‘कोमसाप’चे सदस्य-विश्वस्तांना मालगुंडात आवतण

498
konkan-marathi-sahitya-parishad

कोकण मराठी साहित्य परिषद अर्थात ‘कोमसाप’मधील गृहकलहाने आता थेट धर्मादाय आयुक्तांचे दरवाजे ठोठावल्याचे वृत्त ‘सामना’ने सर्वप्रथम प्रसिद्ध केले आणि कोकणातील साहित्यिक वर्तुळात खळबळ उडाली. आता या बातमीवर चर्चा करण्यासाठी कोमसापने तातडीची बैठक बोलावल्याने कार्यकारिणी सदस्य आणि विश्वस्त मंडळ अवाक् झाले आहे.

‘कोमसाप’मधील ‘किर’किरीला कंटाळून तीन सदस्यांनी धर्मादाय आयुक्तांकडे धाव घेतली आणि थेट संस्था बरखास्तीचीच मागणी केली. संस्थेत आर्थिक घोटाळा झाल्याचा त्या तिघांचा संशय असून रमेश कीर आणि नमिता कीर या दांपत्याने मनमानीपणे पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या केल्याचा त्यांचा आरोप आहे. याबाबतचे वृत्त ‘सामना’ने सोमवारी प्रसिद्ध करताच साहित्य क्षेत्रात खळबळ उडाली. वरळी येथील धर्मादाय आयुक्तांनी रत्नागिरी कार्यालयाला चौकशीचे आदेश दिले असले तरी रत्नागिरी कार्यालयातील निरीक्षक महेश ठिसले हे स्थानिक संस्था निवडणुकीच्या कामात अडकल्याने चौकशी रेंगाळल्याचे सांगण्यात येते. तशात ‘कोमसाप’च्या काही पदाधिकाऱयांनी कागदपत्रांमध्ये अनियमितता असल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे ‘कोमसाप’चे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सभेपुढील विषय

या सभेत इतर संस्था सभेप्रमाणेच पठडीतील विषय आहेत. म्हणजे मागील सभेचे इतिवृत्त मंजूर करणे, जमाखर्चास मंजुरी देणे आणि अध्यक्षांच्या परवानगीने येणारे आयत्यावेळेचे विषय. मात्र एवढय़ाच विषयांसाठी ‘कोमसाप’ने ही ‘तातडीची’ बैठक बोलावलेली नाही, तर ‘कोमसाप’बद्दल वर्तमानपत्रात आलेल्या बातमीवर चर्चा करणे हा या तातडीच्या सभेचा मुख्य उद्देश आहे. या तातडीच्या सभेतील या विषयामुळे कार्यकारिणी सदस्य आणि विश्वस्त मंडळ अवाक् झाले आहे. कारण बातमीवर ‘चर्चा’ करण्यासाठी खास मालगुंडला जायचे का असा प्रश्न त्यांना पडला आहे.

19 तारखेचे आवतण

धर्मादाय आयुक्तांना पाठवलेले पत्र हे 2019च्या ऑक्टोबरमधील आहे. मात्र हे पत्र उघड होताच ‘कोमसाप’मध्ये धावपळ उडाली आहे. संस्थेचे केंद्रीय कार्यवाह शशिकांत तिरोडकर आणि माधव अंकलजे यांनी सर्व केंद्रीय कार्यकारिणी सदस्य आणि विश्वस्त मंडळ सदस्यांना पत्र रवाना केले असून बुधवार, 19 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकात तातडीच्या सभेचे आयोजन करण्यात आल्याने कळवले आहे. कार्याध्यक्षा नमिता कीर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या