
मोबाईलमध्ये गुंतलेल्या पिढीला वाचनाकडे वळवण्यासाठी गावात एक वाचनालय असावे या उद्देशाने संजय कुळये आणि मुग्धा कुळये या दांपत्याने स्वतःच्या घरातच आपले वाचनालय सुरु केले आहे. ग्रामीण भागातील वाचकांना पुस्तके वाचायला मिळत नाहीत. पुस्तके विकत घेऊन वाचण्याएवढी आर्थिक परिस्थिती नसते. अशावेळी राजापूर तालुक्यातील कोंडीवळे गोतावडेवाडीत मोफत वाचनालय सुरु करून एक नवा पायंडा घालून दिला आहे.
संजय कुळये आणि मुग्धा कुळये हे दोघेही कवी आहेत. त्यांना वाचनाची प्रचंड आवड आहे. वाचनाच्या आवडीमुळे त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात पुस्तकांचा संग्रह निर्माण झाला. ही संग्रहित झालेली पुस्तके पुन्हा इतरांना वाचायला मिळावीत या उद्देशाने कोंडीवळे गावात त्यांनी आज गोपाळकालाच्या मुहूर्तावर आपले वाचनालय सुरु केले.. आपल्या घरातच त्यांनी हे वाचनालय सुरु केले असून गावातील वाचकांना मोफत पुस्तके वाचायला मिळणार आहेत. कुळये दांपत्याकडे असलेली 300 पुस्तके आणि खजिना बाल वाचनालय या संस्थेकडून मिळालेली 100 हून अधिक पुस्तके सध्या वाचनालयात उपलब्ध आहेत कथा कविता कादंबऱ्या, आत्मचरित्र, धार्मिक, अध्यात्मिक, वैज्ञानिक, व्याकरण, वैचारिक, शब्दकोश अशी विविध पुस्तके वाचनासाठी मोफत उपलब्ध होणार आहेत.
आपल्या वाचनालयात दर मंगळवार आणि शुक्रवारी संध्याकाळी साडेपाच ते साडेसहा या वेळेत वाचकांना पुस्तके उपलब्ध होणार आहेत. वाचकांनी स्वतःची नोंद करुन पुस्तक वाचण्यासाठी घरी घेऊन जायचे आहे. वाचून झाले की परत ते पुस्तक वाचनालयात जमा करायचे आहे. हे वाचनालय सर्व वाचकांसाठी खुले राहणार आहे. आज वाचनालयाच्या शुभारंभाप्रसंगी काही वाचकांनी पुस्तके वाचायला घेतली. यावेळी चंद्रकांत जानसकर, नंदकुमार गोतावडे, प्रदीप कुळये, चिन्मय कुळये, सुवर्णा कुळये, गार्गी कुळये, सुरेश कुंभार, सरीता कुंभार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजामध्ये वाचनसंस्कृती रुजावी, सुजाण, सुसंस्कृत नागरीक घडावेत या हेतूने आज आपल्या मुलीच्या वाढदिवसादिवशीच आपले वाचनालय सुरु केल्याचे मुग्धा कुळये यांनी सांगितले.