पोसरेतील मदतीचे धनादेश शासनाच्या प्रतिनिधीमार्फत बँकेत जमा, पालकमंत्री अॅड. अनिल परब यांची माहिती

पोसरे येथील दुर्घटनाग्रस्तांच्या वारसांना दिलेले धनादेश त्यांच्या बँकखात्यात भरण्यासाठी तहसीलदारांनी परत घेतले आणि ते धनादेश शासनाच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून दुर्घटनाग्रस्त वारसदारांच्या बँकखात्यात भरण्यात आले आहेत, अशी माहिती पालकमंत्री अॅड. अनिल परब यांनी दिली. पोसरे दुर्घटनाग्रस्तांना दिलेले धनादेश परत घेतले अशा प्रकारची माहिती सोशल मिडीयावर पसरवली जात होती. त्यावर पालकमंत्री परब यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

पालकमंत्री परब म्हणाले की, मी स्वतः गेल्या आठवड्यातील बुधवारी पोसरे येथे जाऊन शासनाच्या मदतीचे धनादेश मृतांच्या वारसदारांना दिले होते. त्या वारसदारांकडे बँकखात्याची माहिती नव्हती. तसेच ती बँक 30 किमीवर चिपळूणमध्ये होती. आणि चिपळूणमधील सर्वच बँका पाण्याखाली गेल्या होत्या. अशावेळी शासनाच्या प्रतिनिधीमार्फत धनादेश त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावेत अशी त्यांची विनंती होती. त्यानुसार ते धनादेश शासनाच्या प्रतिनिधीमार्फत संबंधितांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनीही याबाबत खुलासा केला आहे.

दुर्घटनाग्रस्त लोकांचे घर गाडले गेल्यामुळे त्यांचे बँकखाते क्रमांक किंवा तपशील त्यांच्याकडे उपलब्ध नव्हता. तसेच ती बँक चिपळूणमध्ये 30 किलोमीटरवर असल्याने दुर्घटनाग्रस्तांचे नातेवाईक आणि बौद्ध समाजाचे अध्यक्ष शामकुमार मोहिते यांनी विनंती केल्यामुळे ते धनादेश ताब्यात घेऊन तलाठ्यांमार्फत बँकखात्यात जमा करण्यात आले आहेत. 16 जणांचे युनियन बँकमधील बँकखाते शोधून 62 लाख रुपयांचे धनादेश त्यांच्या बँकेत जमा करण्यात आले आहेत असे जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या