कोकणात मार्कांचा पाऊस!

25

सामना ऑनलाईन, मुंबई

आर्टस्, कॉमर्स, एमसीव्हीसी शाखांमुळे बारावीच्या निकालाचा टक्का यंदा १.०९ ने घसरला आहे. अर्टस् आणि कॉमर्स शाखांच्या निकालात दोन ते अडीच टक्क्यांची घट झाली असून याचा परिणाम बारावीच्या एकूण निकालावर झाला आहे. बारावीचा एकूण निकाल ८८.४१ टक्के लागला आहे. निकाल घसरला असला तरी तब्बल ५ हजार ४८६ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत. प्रथेप्रमाणे कोकण विभागाने सर्वाधिक निकालाची परंपरा कायम राखली असून याही निकालात मुलींचेच वर्चस्व आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज बारावीचा ऑनलाइन निकाल जाहीर केला. राज्यभरातील एकूण १४ लाख १६ हजार ९८६ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी १२ लाख ५२ हजार ८१७ विद्यार्थी पास झाले आहेत. तर पुनर्परीक्षार्थी ६६ हजार ४५६ विद्यार्थ्यांपैकी २२ हजार ७९२ विद्यार्थी पास झाले असून त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ३४.३० इतकी आहे.

यंदा कोकणच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. मुंबई विभागाचा निकाल ८७.४४ टक्के इतका लागला आहे. मुंबईचा निकालातही यंदा घट झाली असली तरी विभागवार निकालात गेल्या वर्षी शेवटच्या स्थानावर असलेल्या मुंबई विभागाने यंदा शेवटून दुसरे स्थान पटकावले आहे.

यंदा सर्वात कमी निकाल नाशिक विभागाचा लागला आहे. ७ लाख ८३ हजार ८९६ मुलांनी तर ६ लाख ३३ हजार ०९० मुलींनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी अनुक्रमे ६ लाख ६८ हजार १२५ मुले तर ५ लाख ८४ हजार ६९२ मुली पास झाल्या आहेत. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.३६ तर मुलांच्या ८५.२३ इतकी आहे.

मुंबईची पोरं हुशार

राज्यातील तब्बल ५ हजार ४८६ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. यातील सर्वाधिक विद्यार्थी मुंबई विभागातील आहेत. मुंबईतील २ हजार २८८ विद्यार्थी नव्वदीपार आहेत. पुण्यातील ७९०, नागपूर ६९८, अमरावती ५९४, लातूर २५९, नाशिक १५६, कोकणातील ६७ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण आहेत. गेल्या वर्षी केवळ ३ हजार ८१९ विद्यार्थ्यांनाच नव्वदपेक्षा जास्त गुण होते.

आपली प्रतिक्रिया द्या