मुंबईकरांची झोप का उडतेय? कूपरमध्ये सुरू आहे संशोधन

1

इंद्रायणी नार्वेकर-करंबे । मुंबई

‘कधीही न झोपणारं शहर’ अशी ओळख असलेल्या मुंबईत अनेकांना विविध कारणांमुळे शांत झोप लागत नाही. मात्र आता निद्रानाशाची कारणे शोधून त्यावरही उपाय करता येणार आहे. पालिकेच्या कूपर रुग्णालयात त्याकरिता पहिलीवहिली ‘स्लीप लॅब’ सुरू करण्यात आली आहे. झोप न लागणे, रात्री अचानक झोपेतून जाग येणे अशा विकारांची कारणे इथे शोधली जात आहेत, मात्र त्याकरिता तुम्हाला कूपरमध्ये एक रात्र झोपावे लागणार आहे.

कितीही थकायला झाले तरी अनेकांना रात्री झोपच येत नाही, झोप लागली तरी मध्येच जाग येते आणि त्यानंतर पुन्हा झोपच लागत नाही. त्यामुळे दुसरा दिवस पुन्हा मरगळलेला जातो, कामात लक्ष लागत नाही, थकल्यासारखे वाटत राहते, पण अंथरुणात पडले की झोप येत नाही. अनेकांना असा निद्रानाशाचा त्रास असतो. काही जण झोपेच्या गोळ्या सर्रास घेतात. ही अतिशय सामान्य समस्या वाटत असली तरी त्याचा माणसाच्या आयुष्यावर मोठा परिणाम होत असतो. निद्रानाशाचे नेमके कारण शोधण्यासाठी कूपर रुग्णालयात एक प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे.

झोप न लागण्याची अनेक कारणे असू शकतात. कधी कधी श्वासनलिकेत अडथळा येणे, टॉन्सिल वाढलेले असणे, नाकाचे हाड वाढलेले असणे, ताणतणाव, मधुमेह, अति ध्रूमपान, अति मद्यपान अशी विविध कारणे त्यामागे असतात. तुमच्या निद्रानाशामागचे अचूक कारण या प्रयोगशाळेत शोधले जाते. अचानक जाग येण्यामागे बऱयाचदा नाकाशी किंवा श्वसन यंत्रणेशी संबंधित कारणे जास्त आहेत. त्यामुळे कूपरच्या कान, नाक, घसा या विभागांअंतर्गत ही प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत इथे साधारणतः १०० रुग्णांनी आपली झोपेची टेस्ट करून घेतली असल्याची माहिती कूपरचे अधिष्ठाते डॉ. गणेश शिंदे यांनी दिली. निद्रानाशाची समस्या घेऊन एखादा रुग्ण आला की आम्ही त्याची आधी ईएनटी विभागात तपासणी करतो. कान, नाक, घशाशी संबंधित समस्या असेल तर शस्त्रक्रिया करून ती दूर करता येते. पण त्याव्यतिरिक्त काही कारण असेल तरच त्यांची स्लीप लॅबमध्ये टेस्ट घ्यावी लागते, असेही डॉ. शिंदे यांनी सांगितले.

झोप ही खरे तर आपल्या प्रत्येक समस्येवरचा उपचार आहे. कोणताही आजार, थकवा, ताणतणाव असेल तरी झोप पूर्ण झाल्यानंतर माणसाला ताजेतवाने वाटते. त्यामुळे निद्रानाशाचे कारण शोधणे अतिशय आवश्यक आहे. ते शोधले नाही तर चिडचिड होतेच, पण काही गंभीर कारणामुळे रुग्णाचा झोपेत मृत्यू ओढवू शकतो. ही सगळी कारणे शोधून त्याचाही आम्ही डाटा तयार करून त्यावर संशोधन करणार आहोत.
– डॉ. गणेश शिंदे, अधिष्ठाते, कूपर रुग्णालय

सॉफ्टवेअरद्वारे शोधतात निद्रानाशाचे कारण
कान, नाक, घशाशी संबंधित कोणताही विकार नसेल तर त्यामागे काही मानसिक ताणतणावाचे कारण आहे का याचाही शोध घेऊन, तसे असल्यास मानसोपचाराची मदत घेतली जाते. मात्र ते कारणही नसेल तर रुग्णाला एक रात्र लॅबमध्ये झोपवले जाते व त्याच्या झोपेच्या पॅटर्नचे निरीक्षण केले जाते. या लॅबमध्ये संगणक यंत्रणा असून त्यात विशिष्ट सॉफ्टवेअर आहे. त्याद्वारे तुमच्या समस्येचे अचूक कारण शोधले जाते व त्यावर उपचार केले जातात.