विजेच्या लपंडावाने शेतकरी हवालदिल, पिकांना पाणी देण्यास अडचण

गेल्या काही दिवसांपासून चांदी कासारे परिसरात सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. परिसरात गेल्या काही दिवसांपासून विजेचा खोळंबा झाला आहे. वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकरी चांगलेच हवालदिल झाले असून त्यांच्या भावना तीव्र आहेत.

चांदेकसारे परिसरात चांदेकसारे, पोहेगाव, सोनेवाडी, दर्डे चांदवड देर्डे कोऱ्हाळे डाऊच खुर्द डाऊच बुद्रुक घारी आदी परिसरात शेतामध्ये रब्बीचे गहू, हरभरा, मका, कांदा अदी पिके उभी आहेत रात्रीचा वीज पुरवठा होत असल्याने आधीच अडचण झालेली आहे त्यात मात्र मोटार चालू करून पाणी भरताना वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे आपल्या विहिरीवर मोटार चालू करण्यासाठी जावे लागते. हा प्रकार दिवसातून तब्बल 10 ते 15 वेळेस घडतो. त्यात कमी दाबाने विद्युत पुरवठा होत असल्याने आपल्या शेतात पिकांना पाणी द्यायचे कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गोदावरी उजव्या कालव्याचे पाणीदेखील सध्या लांबले असून शेतीला पाणी कधी मिळणार, याची तारीख निश्चित नसल्याने शेतकऱ्यांना आपल्या विहीर, विंधन विहीर व तळ्यावर विद्युत मोटर टाकून पिकांना पाणी देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे भरणे टांगले आहे. त्यामुळे विद्युत महावितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत न बघता दिलेली वीज पूर्ण दाबाने द्यावी, अशी मागणी चांदेकसारे परिसरातून शेतकऱ्यांनी केली आहे. या समस्यांमुळे शेतकरी हलावदिल झाले आहेत.