कोपरगावातील जेऊर कुंभारीत पोलिसांनी हस्तक्षेप करत बालविवाह रोखला

418

मुलीचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि मुलाचे वय 21पेक्षा कमी असूनही ठरत असलेल्या विवाहात कोपरगाव पोलिसांनी हस्तक्षेप करत रविवारी बालविवाह रोखण्यात यश मिळवले आहे. बालविवाह ठरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धाव घेत ठरत असलेला बालविवाह थांबवला आहे. शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जेऊर कुंभारी भागात एका अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

या घटनेची माहिती मिळताच रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सहायक फौजदार शैलेंद्र गंगाधर ससाणे, पोलीस कॉन्स्टेबल संदिप शांताराम काळे, क्लार्क आनंद बारसे, पोलीस पाटील बाबासाहेब गायकवाड यांनी तातडीने या भागात धाव घेत संबंधितांची चौकशी केली. सतिष इस्ते यांचे घराजवळ असलेल्या महादेव मंदीरासमोर मंडप टाकला होता. तेथे काही महिला दागिने घालून बसल्या होत्या. मंडपामध्ये सतिष इस्ते व त्याची पत्नी विमल होते. त्यांच्याकडे चौकशी केली असता, आम्ही आमची मुलगी कोमल हिचे प्रशांत जगन्नाथ आव्हाड (रा.घुलेवाडी, ता.संगमनेर) यांच्याशी लग्न ठरले असून आज होणार असल्याचे सांगितले. या लग्नासाठी प्रशांत आव्हाड याचे वडील जगन्नाथ आव्हाड आणि आई कविता जगन्नाथ आव्हाड तयार असल्याचे सांगितले.

कोमल सतिष इस्ते हिचे वय 16 वर्षे 7 महिने असल्याने ती अल्पवयीन आहे. तसेच प्रशांत जगन्नाथ आव्हाड याचे वय 18 वर्षे 11 महिने असल्याने त्याला 21 वर्षे पूर्ण नाही. लग्नासाठी दोघांचे वय योग्य नसतानाही त्यांचे आई-वडील लग्न लावून देणार होते. ही बाब बालविवाह प्रतिबंधक कायद्याचा भंग करणारी असल्याने मुलीचे आई-वडील सतिष इस्ते, विमल इस्ते (दो.रा.जेऊर कुंभारी, ता.कोपरगाव) आणि मुलगा प्रशांत आव्हाड, त्याचे वडील जगनाथ आव्हाड, आई कविता आव्हाड ( रा.घुलेवाडी, ता.संगमनेर) यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्यांच्याविरुध्द पोलीस पाटील बाबासाहेब गायकवाड यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून पाच जणांनी संगनमत करुन लग्नाकरीता मंडप टाकून विवाहाची तयारी केली होती. या बालविवाहप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार ससाणे पुढील तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या