राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे कार्टून नेटवर्क होईल!- आदित्य ठाकरे

217

सामना प्रतिनिधी। कोपरगाव

काँग्रेस-राष्ट्रवादीसह 56 पक्ष एकत्र येऊन सत्तेची स्वप्न पाहत आहेत. त्यांच्यातील अनेकजण पंतप्रधानपदासाठी इच्छुक आहेत, मात्र त्यातील राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे कार्टून नेटवर्क होईल, असा जबरदस्त टोला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी लगावला. काँग्रेस देशात सगळीकडे भांडणे लावण्याचे काम करत असून ही आघाडी सत्तेत आली तर देशाचे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाहीत, असा हल्लाबोलही त्यांनी विरोधकांवर केला. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी कोपरगावात येथे आयोजित जाहीर सभेत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे बोलत होते.

आदित्य ठाकरे म्हणाले, राज्यभर महायुती भक्कम आहे. देशात आज पाकिस्तानला धडा शिकविणारे, त्यांच्या हद्दीत घुसून ठोकून काढणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे. कश्मीरला देशापासून तोडू पाहणाऱया देशद्रोह्यांना धडा शिकविण्यासाठी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार येणे आवश्यक आहे. त्यासाठी महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, असे आवाहन त्यांनी केले.

काँग्रेस-राष्ट्रवादीसह 56 पक्षांची महाआघाडी सत्तेचे स्वप्न पाहत आहे. विरोधकांच्या या आघाडीला 370 वे कलम हवे आहे. देशद्रोहाचे 124 कलम रद्द करायचे आहे. या काँग्रेसने देशात सगळीकडे भांडण लावण्याचे काम केले आहे. अशी ही काँग्रेस आघाडी सत्तेत आली तर या देशाचे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाहीत अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केला. यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, जिल्हा संपर्कप्रमुख आमदार नरेंद्र दराडे, आमदार स्नेहलता कोल्हे, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, राजेंद्र झावरे, साई संस्थानचे विश्वस्त बिपिन कोल्हे, शिवाजी ढवळे, रिपाइं आठवले गटाचे राज्य सचिव दीपक गायकवाड यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, नगरसेवक पंचायत समिती सदस्य सरपंच, कार्यकर्ते हजर होते.

पाण्यासाठी हवी ती मदत करीन

कोपरगाव शहर आणि तालुक्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी मी स्वतः पाहिजे तिथे सोबत येईन. घाटमाथ्यावरचे पाणी वळवणे असो अथवा नदी वळविणे, यासंदर्भातील इतरही कामे असतील त्यासाठी हवी ती मदत करेन असे वचन देतो. तुमच्या पाण्याच्या कामाच्या भूमिपूजनाला मी स्वतः येईन अशी ग्वाही आदित्य ठाकरे यांनी देताच उपस्थितांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला.

जिथे जातो तिथे भगवी लाट दिसतेय!

आदित्य ठाकरे म्हणाले, शिवसेना-भाजप महायुतीने राज्यात आणि केंद्रात सर्वांगीण विकासाची कामे केली आहेत. वचननाम्यातील सर्व कामे पूर्ण केल्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. जी वचने दिली होती ती पूर्णत्वाला नेली आहेत. त्याचा परिणाम मला महाराष्ट्रात ठिकठिकाणी दिसतो आहे. जिथे जिथे मी प्रचारासाठी फिरतोय तेथे सर्व ठिकाणी भगवी लाट आल्याचेच मला दिसते आहे. त्यामुळे महायुतीचा विजय निश्चित आहे. खासदार सदाशिव लोखंडे यांनीही आपल्या कार्यकाळात विकासाची कामे केली आहेत. आज जमलेली ही गर्दी पाहिली की लोखंडे भरघोस मतांनी विजयी होणार यात काही शंका नाही, असेही ते म्हणाले. भाऊसाहेब वाकचौरे हे धोकेबाज असून त्यांनी पक्षाला धोका दिला आहे. त्यामुळे शिर्डीतील मतदार त्यांना माफ करणार नाहीत असा हल्लाबोलही त्यांनी केला.

आपली प्रतिक्रिया द्या